कधी लग्नाला गेलेले असताना जेवणाच्या ताटातले बाकीचे सगळे मुख्य पदार्थ सोडून एका पिवळ्या रंगाच्या, अत्यंत रुचकर, मऊसुत अशा साईड डिश कडे आपले सगळे लक्ष एकवटले आहे असे तुमच्या बाबतीत कधी झालाय का? किंवा घरी येताना अचानक एखाद्या दुकानातला ओलं खोबरं, कोथिंबीर आणि फोडणीनी सजलेला ट्रे नजरेला पडल्यावर त्यातल्या पदार्थाकडे तुम्ही खेचले गेलात आणि तो घरी घेऊनच आलात असं कधी झालाय का? कधी घरी सणाच्या दिवशी किंवा कोणी येणार म्हणून आईनी विशेष बनवलेल्या जेवणातले पदार्थ टेबलावर मांडून ठेवलेले असतात आणि त्यातला एक चवदार, खमंग पदार्थ येता जाता सारखा तोंडात टाकावा अशी तीव्र इच्छा होत असते असं कधी झालाय का? माझ्या बाबतीत तर हे अनेकदा झालाय, सुरळीच्या वड्या बघून.....
हा पदार्थ म्हणजे एक आश्चर्य आहे. एकच पदार्थ सौम्य पण खमंग, म्हणलं तर तिखट, म्हणलं तर आंबट आणि गोडसर, मधेच मऊसुत आणि मधेच कोथिंबीर, खोबऱ्यामुळे जरा जाडसर असा कसा काय लागू शकतो! इतका नाजूक की दातांऐवजी ओठांनीही खाऊ शकाल.
सुरळीच्या वड्यांच्या बाबतीत एक आठवण मला नेहमी आठवते. हा पदार्थ मला स्वतःला इतका आवडतो की मी त्या ममाकडून शिकले होते आणि बऱ्याचदा केल्याही होत्या. माझं लग्न ठरल्यानंतर मी एकदा होणाऱ्या सासरी गेले होते तिकडेही सुरळीच्या वड्या सगळ्यांना खूप आवडतात म्हणून मी त्या बनवल्या, तेजसच्या आजी, आजोबांकडेही घेऊन गेले. सगळ्यांना त्या अतिशय आवडल्या. माझं खूप कौतुक झालं आणि सुरळीच्या वड्या जमल्या म्हणजे हिला सगळाच स्वयंपाक छान जमतो अशी सगळ्यांनी पावती दिली. आता गम्मत अशी होती की तोपर्यंत मी अनेक पदार्थ बनवत असले तरी रोजचा स्वयंपाक बनवण्याची सवय नव्हती. त्यामुळे सगळ्यांचा माझ्याबद्दल झालेला समज अर्धा खरा होता. ही हकीकत बाकी सगळ्यांना कळली तेव्हा मात्र सगळ्यांनी, "मालविकानी सुरळीच्या वड्या करून सासरच्यांना गुंडाळलं." असं चिडवून मला हैराण केलं.
तर अशा या सुरळीच्या वड्या आता तुम्हालाही खाव्याशा वाटायला लागल्या आहेत ना? चला मग लगेच बनवूया.
साहित्य:
1 वाटी डाळीचे पीठ, 1 वाटी ताक किंवा दही, 2 वाट्या पाणी, पाऊण इंच आलं, 1 मिरची, हळद, 1 ते 1.5 चमचा साखर, चवीनुसार मीठ, आवडत असल्यास 1-2 पाकळ्या लसूण, पाऊण वाटी खवलेलं ओलं खोबरं, पाऊण वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.
फोडणीसाठी: तेल, मोहोरी, तीळ, हिंग.
कृती:
- डाळीचे पीठ चाळून घ्या.
- मिक्सर मध्ये आलं आणि मिरची बारीक वाटून घ्या. त्यातच डाळीचे पीठ, दही / ताक, पाणी, मीठ, साखर, हळद टाका आणि मिक्सर मधेच नीट मिसळून घ्या. (मिक्सर मध्ये सर्व घटक मिसळल्यामुळे अजिबात गुठळ्या होत नाहीत.)
- एका कढईत मिश्रण ओतून gas वर ठेवा आणि सतत ढवळत रहा.
- मिश्रणात चमचा घालून तो उचलून बघा मिश्रण जीभेसारखे (फोटोत दाखवल्याप्रमाणे) दिसले की कढईवर झाकण ठेवा. 4-5 मिनिटांनी चांगली वाफ आली की gas बंद करा.
- मिश्रण अगदी गरम असताना पटकन प्लास्टिकच्या sheet वर शक्य तितके पातळ पसरा. त्यावर खवलेलं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पसरा. (काही वेळा खोबरं, कोथिंबीर अशी आत न घालता वड्या गुंडाळून झाल्यावर फक्त वरून घातली जाते पण अशा वड्या थोड्या सपक लागू शकतात. वड्या खोबरं, कोथिंबीर पसरून गुडाळल्या की त्याची चव छान आतपासून लागते.)
- पसरलेल्या मिश्रणावर सुरीनी उभ्या रेघेत कापा आणि हलक्या हाताने वडी गुंडाळा.
- तेल तापवून त्यात मोहोरी, हिंग, तीळ टाका. ही फोडणी सुरळीच्या वड्यांवर वरून टाका. सजावटीसाठी थोडं खोबरं, कोथिंबीर टाका.