Tuesday, June 4, 2013

खास 'आम' चिकन



     नुकतीच वार्षिक परीक्षा संपली आहे आणि आता चिक्कार हुंदडण्याचे दिवस! चुलत, मावस भावंडे राहायला येणार आणि मग नुसता धुडगूस. सकाळी शक्य तितकं उशिरा उठायचं. तब्येतीत खाऊन मग सगळे मित्र मैत्रिणी गोळा करून दिवसभर नुसते पत्ते, कॅरम खेळत बसायचं आणि संध्याकाळी बाहेर खेळायला जायचं ते पार रात्रीच्या जेवणाची वेळ होईपर्यंत घरी उगवायचंच नाही. रात्री उशिरापर्यंत सिनेमे बघत बसायचं आणि "झोपा आता" असं मोठ्यांचं ओरडणं कानावर पडलं तरी पांघरूणाच्या आत तोंड लपवून खुसू खुसू हसत बसायचं. सुट्टीतल्या शिबिरांना, पोहायला जायचं. गच्चीत आईस्क्रीम, भेळ पार्टी करायची. दुपारी तंगड्या भिंतीला लावून पुस्तक वाचत बसायचं… आणि "ए कुल्फीवाले" किंवा "डोंग s s रची मैना… का s s ळी मैना" असल्या आरोळ्या कानावर पडल्या की तडक उठून पळत रस्त्यावर जायचं आणि काहीतरी खात घरी परतायचं. 
     उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची एकूणच खाण्या पिण्याची एकदम चंगळ असायची. आम्ही घरीच असल्यामुळे मम्मा सतत आमच्या फरमाईशी नुसार काहीना काही खायला बनवायची. मित्र- मैत्रिणी किंवा नातेवाईक एकत्र येऊन, कुणाच्या तरी घरी आईस्क्रीमचा पॉट आणून पार्टी करणे यासारखे कार्यक्रमही अधून मधून चालायचे. उन्हाळ्याची पापड, कुरडया करण्याची कामं मम्मानी काढली की मग तर माझ्या उत्साहाला नुसता पूर यायचा. तिला या सगळ्यात मदत करणे एकीकडे चालू असले तरी मुख्य उद्देश म्हणजे पापडाच्या बोट्या, कुरडयांचा चीक खाणे. दुपारी उन्हात जाऊन अर्धवट वाळलेल्या पापड्या खाणे हाच असायचा. आम्ही पुण्याला आजीकडे गेलो की कोकम किंवा लिंबाचं सरबत, ऊसाचा रस, शहाळ प्यायचो. जांभळं, करवंद, फणसाचे गरे, अंजिर, पेरू ही सगळी फळं सुद्धा अगदी यथेच्च खायचो.  
     तुम्हाला प्रत्येकालाच थोड्याफार फरकानी तुमचं हे बालपण आठवत असेल. पण या सगळ्यात अजून एक अतिशय महत्वाची गोष्ट राहिलीच. ती म्हणजे आंबे!! आपल्याकडे एकूणच आंब्यांचा सीझन म्हणजे एक सोहोळाच असतो. मे महिन्यात भरपूर आंबे यायला लागायच्या आताच बाजारात ते क्वचित कुठे कुठे दिसू लागतात. मग सगळीकडे, "सध्या आंबे कुठे मिळताहेत आणि त्यांचा भाव काय आहे" याची जोरात चर्चा चालू होते. आणि मग काही दिवसातच बाजारात सगळीकडे आणि प्रत्येकाच्या घरी नुसते आंबेच आंबे दिसायला लागतात. त्यातसुद्धा भारतभर आंब्यांच्या दशेहरी, लंगडा, नीलम, केसर यासारख्या कितीतरी जाती मिळतात आणि त्या त्या भागात काही ठराविक जाती प्रसिध्द असतात. महाराष्ट्रात पायरी, रायवळ, तोतापूरी ह्या जाती मिळत असल्या तरी सगळी लोकं हापूससाठी अगदी वेडी असतात. 
     आम्ही लहान असताना सुट्टीत पुण्याला गेलो की सकाळी लवकर उठून गूळटेकडी market-yard ला जायचो आणि तिथे हापूस आंब्यांची पेटी आणि पायरी आंब्यांची करंडी अशी खरेदी करायचो. तिथे त्या दुकानदाराशी घासाघीस करून, आंब्यांचा भाव ठरवून, भरपूर आंबे घेऊन घरी आलो की पहिली गोष्ट म्हणजे निदान एक दोन आंबे तरी लगेचच पोटात लोटायचे. मग एखाद्या खोलीत खाली वाळलेलं गवत पसरून त्यावर पिकलेले आंबे एकीकडे, कच्चे आंबे एकीकडे अशी अढी लावायचो. आणि मग पुढचे काही दिवस सतत कुठले आंबे आधी पिकाताहेत यावर लक्ष ठेवायचो. रोज सकाळी उठलो की आंबे खाण्याचा एक मोठ्ठा कार्यक्रम व्हायचा. त्यातही प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने खायचं असायचं. कोणाला फोडी, कोणाला हापूसचा टब्बू तर कोणाला चोखून. मला नेहेमी हापूस पेक्षा पायरी जास्त आवडायचा. तो सुद्धा थोडा कच्चा, आंबट!! तो चोखून खाण्यात आणि मग साली, कोय चोखाण्यात बऱ्याचदा मला आजूबाजूच्या जगाचा विसर पडायचा. त्यातही कितीही नीट खाल्लं तरी कपड्यावर डाग पडायचेच त्यामुळे नेहेमी जुने कपडे घालून आणि खाली पेपर पसरून आंबे खायचो. मग दुपारी जेवणात कधी आमरस, कधी आम्रखंड, कधी नुसत्या दुधात आंब्यांचे तुकडे. तर कधी खास बेत ठरवून आंबा आईस्क्रीम… 
     काय मग, तुम्ही पण आंब्यांच्या स्वप्नात रंगलात ना? तुमच्याही जिभेवर आंब्याची ती मधुर चव तरळली ना? आज मला अचानक हे सगळं आठवलं याचं कारण मागच्या आठवड्यात बऱ्याच वर्षांनंतर मी पूर्ण आंबामय झाले होते. पुण्यातलं शिक्षण संपल्यावर मधली दोन वर्ष दिल्लीत आणि मग गेली तीन वर्ष अमेरिकेत असल्यामुळे अशाप्रकारे आंबा मोहोत्सव साजरा करण्याची वेळच आली नव्हती. अजूनही उन्हाळ्यात आंबे खाल्ले नाहीत तर तो उन्हाळा पूर्ण झाल्यासारखा वाटतच नाही. पण या वर्षी इथे कॅलिफोर्निया मध्ये मला हापूस आंबे मिळाले आणि त्या सगळ्या जुन्या आठवणीत (आणि आंब्यात) मी पुरती बुडाले.  
     पण या वेळचा वेगळेपणा म्हणजे नुसते आंबे खाणे आणि त्याचे पारंपारिक पदार्थ करणे याचबरोबर मी त्याच्यात काही अगदी नवीन प्रयोग करून पहिले आणि त्यातून अगदी भन्नाट आणि विश्वास बसणार नाही इतक्या अप्रतिम चवींचे पदार्थ बनवले. आपण नेहेमी आंब्याचे गोड पदार्थ खातो पण मी आंब्याची चव असलेले दोन अगदी वेगळ्या चवीचे रस्से बनवले. एक नारळाच्या दुधाची चव असलेला आणि दुसरा चायनीज स्टाईलचा. 
     अ s s हं गोंधळून जाऊ नका. खरच मला 'आंबा घातलेला तिखट रस्सा' असच म्हणायचं आहे. तुम्ही डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवा आणि खरच हे दोन्ही पदार्थ करून बघाच. (पदार्थ करताना डोळे उघडायला विसरू नका :)) माझी खात्री आहे की एकदा हे पदार्थ तुम्ही खाल्ले की प्रत्येक आंब्याचा सीझन हे पदार्थ केल्याशिवाय पूर्णच होणार नाही. तुमचा अभिप्राय मला कळवायला विसरू नका.


Coconut Mango Chicken: 


साहित्य: 
200 ग्रॅम बोनलेस चिकन, 1 आंबा, 1/2 कप नारळाचे दूध, 1/4 इंच आलं, 2 पाकळ्या लसूण, 3 -4 हिरव्या मिरच्या, 1/2 टीस्पून लिंबाचा रस, 1 टीस्पून सायीचे दही किंवा sour cream, मीठ, मिरपूड, साखर, तेल, कोथिंबीर, काजू (किंवा बदाम) 
(200 gram boneless chicken, 1 mango, 1/2 cup coconut milk, 1/4 inch ginger, 2 cloves garlic, 3-4 green chilies, 1/2 teaspoon lime juice, 1 teaspoon sour cream or curd, salt, crushed black pepper, sugar, oil, cilantro, cashew nuts.)




कृती:





  • चिकनचे तुकडे करा. त्यात आलं, लसूण पेस्ट, सायीचे दही (किंवा sour cream), लिंबाचा रस, मीठ, मिरपूड घालून 15 मिनिटे मरीनेट करा. (Cut chicken in to pieces. Add ginger, garlic paste, salt, pepper, lime juice, sour cream and marinate for 15 min.)
  • हिरव्या मिरचीचे उभे तुकडे करा. एका कढईत थोडे तेल तापवा आणि त्यात मिरचीचे तुकडे टाका. त्यात चिकन टाकून 1 मिनिट, चिकनचा रंग पांढरा होईपर्यंत शिजवा. जास्त वेळ शिजवलं तर चिकन घट्ट, कडक होतं. (Cut julians of chili and keep it aside. Heat oil in the pan. Add chili, and marinated chicken. Saute till almost cocked.)
     

  • त्यात आंब्याचा रस टाकून नीट मिसळा. त्यात नारळाचे दूध घाला. चवीनुसार मीठ, साखर आणि लिंबाचा रस घाला. ग्रेव्ही थोडी पातळ हवी असेल तर थोडे पाणी घाला आणि थोडेसे उकळा. (Add mango pulp and soute. Add coconut milk, salt and sugar. Add some water and brig it to boil.)
     

  • Gas बंद करून त्यात आंब्याचे तुकडे आणि काजू घाला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि भाताबरोबर त्याचा आस्वाद घ्या. (Remove it from stove and add mango pieces, cashew nuts and chopped coriander. Serve with steamed rice.

     आंबे, नारळ, काजू, भात हे सर्व एकाच प्रांतातले असल्यामुळे आणि अनेक पदार्थात एकत्र खात असल्यामुळे त्यांच्या चवी एकमेकांना अतिशय पूरक आहेत. या पदार्थासाठी थोडा कच्चा, आंबट आंबा वापरा. आंब्याची आंबट गोड चव नारळाच्या दुधाबरोबर खूप मस्त लागते. मधूनच हिरव्या मिरचीचा तिखटपणा आणि स्वाद यांनी मजा येते. मुलायम ग्रेव्ही, त्यातले लुसलुशीत शिजलेले चिकन याबरोबर मधेच दाताखाली येणारे काजू एकदम रंगत आणतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंब्याचा तो अद्वितीय स्वाद या पदार्थाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. यात चिकन ऐवजी पनीर सुद्धा तितकेच चांगले लागते. 









Mango Chili Chicken:


साहित्य:
200 ग्रॅम बोनलेस चिकन, 1 आंबा, 1/4 इंच आल्याचे बारीक तुकडे, 2 पाकळ्या लसणाचे बारीक तुकडे, 3 -4 सुक्या लाल मिरच्या, 1 1/2 टीस्पून भाजलेले तीळ, 1/2 टीस्पून लिंबाचा रस, 1 अंड, 1/2 कप उभा चिरलेला कांदा, 4 -5 ढब्बू मिरचीच्या चकत्या, 1/2 टीस्पून सोया सॉस, 1 1/2 टेबलस्पून कॉर्न स्टार्च, मीठ, मिरपूड, साखर, तेल, कोथिंबीर. 
200 gram boneless chicken, 1 mango, 1/4 inch ginger finely chopped, 2 cloves garlic finely chopped, 3-4 dry red chilies, 1 1/2 teaspoon roasted sesame seeds, 1/2 teaspoon lime juice, 1 egg, 1/2 cup onion cut in strips, 4-5 slices of capsicum (green pepper), 1/2 teaspoon soya sauce, 1 1/2 tablespoon corn starch, salt, crushed black peper, sugar, oil, cilantro. 

कृती:
  • चिकनचे तुकडे करा. त्यात अंड, मीठ, मिरपूड, सोया सॉस, 1 टेबलस्पून कॉर्न स्टार्च घालून 15 मिनिटे मरीनेट करा. एका कढईत तेल तापवून त्यात चिकनचे तुकडे तळा आणि बाजूला ठेवून द्या. (Cut chicken in to pieces. (Add egg, salt, pepper, soya sauce, 1 tablespoon corn starch and marinate for 15 min. Heat oil in a pan and deep fry chicken pieces. Keep it aside.)
     

  • एका कढईत थोडे तेल तापवा आणि त्यात सुक्या लाल मिरच्या, तीळ टाका. (Heat oil in a pan and add dry red chilies, sesame seeds.) 
     

  • त्यात आलं लसणाचे तुकडे टाका. कांदा, ढब्बू मिरचीच्या चकत्या घालून परता. (Add chopped ginger, garlic. Add onion and sliced green pepper and sauté.) 
     

  • त्यात आंब्याचा रस टाकून नीट मिसळा. कॉर्न स्टार्च थोड्याशा पाण्यात कालवून ते मिश्रण घाला. एकीकडे सतत ढवळत रहा. त्यात चवीनुसार मीठ, साखर आणि लिंबाचा रस घाला. ग्रेव्ही थोडी पातळ हवी असेल तर थोडे पाणी घाला. तळलेले चिकन ग्रेव्ही मध्ये मिसळा. (Add mango pulp and mix it well. Add little water in corn starch to make paste and add it to gravy. Stir constantly. Add salt, sugar and lime juice. Add water for thiner gravy. Add fried chicken in gravy.)
     

  • Gas बंद करून त्यात आंब्याचे तुकडे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, तीळ घाला आणि भाताबरोबर त्याचा आस्वाद घ्या. (Remove it from stove and add mango pieces, chopped coriander and sesame seeds. Serve with steamed rice.)

     या पदार्थामध्ये चिकनचे तुकडे हे अंड आणि कॉर्न स्टार्च मध्ये बुडवून तळल्यामुळे त्याला बाहेरून एक आवरण येतं आणि त्याला लागलेला आंब्याचा सॉस त्याची लज्जत वाढवतो. चिकन ऐवजी पनीर किंवा बेबी कॉर्न सुद्धा यात खूपच मस्त लागतात. ते तळण्यासाठी वरीलप्रमाणे मिश्रण बनवा फक्त त्यात अंड्याऐवजी पाणी घाला. या पदार्थासाठी सुद्धा थोडा आंबट आंबा घ्या म्हणजे त्याची आंबट गोड चव या चायनीज स्टाईलला पूरक होईल. यात मधेच दाताखाली येणारे तीळ, आंब्याचे तुकडे एकदम बहार आणतात. आणि सुक्या मिरच्यांच्या स्वदाबद्दल तर काय बोलावे!! यात आंबा, ढब्बू मिरची, सुक्या लाल मिरच्या, कोथिंबीर आणि तीळ या सर्वांच्या विविध नैसर्गिक रंगांची अतिशय सुंदर रंगसंगती दिसते. आणि नुसता पदार्थ बघूनच तोंडाला पाणी सुटते. 

     आंब्याचा असाच अजून एक चविष्ट पदार्थ  'आंबा भेंडी' हा पण जरूर करून बघा. त्याची पाककृती तुम्हाला माझ्या बाबाच्या ब्लॉग वर इंग्लिश आणि मराठीत मिळेल. चला तर मग लगेच तयारीला लागा. आणि आंब्याचा सीझन संपण्याच्या आत याचा आस्वाद घ्या. 

Sunday, February 3, 2013

Cookies

     आपण superstore मध्ये गेलेलो असताना आपल्या लक्षात येतं की घरात चहा, कॉफी बरोबर खायला काहीच नाहीये. म्हणून मग आपण बिस्किटांच्या गल्लीत जायला वळतो. तिथे खरेदी करताना अचानक आपलं लक्ष तिथे ठेवलेल्या cookies च्या पुड्याकडे जातं. त्याच्यावर cookies चा सुंदर फोटो असतो. आपल्याला मोहात पाडण्यासाठीच हे असले फोटो छापतात आणि त्यानुसार आपण तत्काळ त्याच्या मोहात पडतोच. नेहमीच्या बिस्कीटांपेक्षा जरा महाग असले तरी 2-3 वेगवेगळे पुडे घेतो आणि खुशीत घरी येतो. घरी येऊन तो पुडा फोडून बघितल्यावर आपल्या लक्षात येत की त्यात जेमतेम 6-7 cookies असतात. मग मात्र आपण हिरमुसतो. "या अशा एवढ्याशा cookies विकत आणण्यापेक्षा त्या घरी करता आल्या तर!!!" असा विचार करत आपण उरलेल्या cookies चा फन्ना उडवतो. तर या अशाच विचाराने मी घरी cookies करायला लागले. 
     मुळात मी फार बिस्कीटप्रेमी नसल्यामुळे मी त्या वाटेला जाऊन अजून काय काय प्रकार आहेत ते फारसं कधी बघितलं नव्हतं. मग एकदा मी बंगलोरला cookies खाल्ल्या आणि त्या मला खूपच आवडल्या. त्यानंतर एकदा गिरीजा ओक हिनी दाखवलेली cookies ची एक रेसिपी मी T.V. वर पहिली आणि cookies करून पहिल्या तर त्या खूपच मस्त झाल्या. मग काय त्या नंतर मी अनेक प्रयोग करण्याचा सपाटाच लावला. वेगवेगळ्या flavours, coatings, fillings असलेल्या cookies करून पहिल्या. एकदा तर मी मम्मा घरात नसताना cookies करत होते. ती बाहेरून आली तर म्हणाली, "Cookies चे प्रयोग चालू दिसताहेत." मी म्हणाले, "तुला कसं कळलं?" तर ती म्हणाली, "बाहेर पार खालच्या मजल्यापर्यंत cookies चा छान खरपूस वास येतोय. मलाच काय एव्हाना सगळ्या शेजाऱ्यांनाही कळलं असेल :)"
     Cookies सगळ्यांना आवडतात म्हणून नेहेमी केल्या जातात. त्या ओव्हन मध्ये ठेवून हळूहळू बेक व्हायला लागल्या की त्याचा दरवळ घरभर सगळीकडे पसरतो आणि घरातल्या सगळ्यांची स्वयंपाकघराकडे चकरा मारायला सुरुवात होते. सगळ्यांना त्या शिकायच्याही असतात. माझी 5 वर्षांची भाची अनुष्का हिच्यासाठी मी नेहेमी cookies करायचे. मागे एकदा तिने तिच्या आईबरोबर cookies केल्या तर तेव्हापासून ती सगळ्यांना सारखी त्याची रेसिपी तिच्या पद्धतीनी सांगत असते.
     तर अशा ह्या खरपूस भाजलेल्या, खुसखुशीत आणि yummyyy ... cookies तुम्हाला शिकायच्यात का? मग अनुष्काला भेटा :) :) किंवा मी खाली दिलेल्या त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी वाचा आणि नक्की करून बघा. चला तर मग तुमचं किचन तुमची वाट बघतय...!!! 


Butter vanilla cookies:



साहित्य: 140 ग्रॅम (1 1/4 कप) मैदा, 80 ग्रॅम (3/4 कप) पीठी साखर, 115 ग्रॅम (1/2 कप) लोणी, 3/4 टीस्पून बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून vanilla essence, 1/2 अंड 








कृती:

भाग 1: 
  • एका ट्रेला ग्रीसिंग करा किंवा ट्रेवर बटर पेपर लावा. nonstick ट्रे ला काही करावे लागत नाही.
  • मैदा आणि बेकिंग पावडर तीनदा चाळून घ्या. 
  • अंड फोडून जरा फेटून घ्या.
  • लोणी चकचकीत दिसेपर्यंत फेटा. त्यात पीठी साखर घालून फेटा. मग त्यात अंड घालून फेटा. त्यात vanilla essence घाला. 
  • त्यात मैदा आणि बेकिंग पावडरचे मिश्रण cut and fold पद्धतीने मिसळा. मैदा आणि अंड्याचा संपर्क आला की फुगण्याची क्रिया चालू होते त्यामुळे यानंतर कमीत कमी वेळात बेक करा. 
हे cookies साठी basic मिश्रण तयार झाले. यात आपण काही बदल करून अनेक प्रकारच्या cookies करू शकतो.






भाग 2:


मिश्रणाचे गोळे करून चपटे करा आणि ट्रे मध्ये ठेवा. Cookies तयार झाल्या की मूळ आकाराच्या दीडपट होतात त्यामुळे चपटे गोळे एकमेकांपासून काही अंतरावर ठेवा. ओव्हन 5-7 मिनिटे 200deg. C (400deg. F) ला preheat करा. ट्रे आत ठेवून 150deg. C (300deg. F) ला 15 मिनिटे बेक करा. 





Chocolate chip cookies:








साहित्य: 2 टेबलस्पून chocolate chips 
कृती: 
  • वरील कृतीनुसार भाग 1 करा. तयार झालेल्या मिश्रणात chocolate chips टाका आणि हलक्या हाताने cut and fold पद्धतीने मिसळा.
  • मिश्रणाचे गोळे करून किंचित चपटे करा आणि त्यावर chocolate chips लावा. हलक्या हाताने किंचित दाबा. पुढची कृती भाग 2 नुसार करा. 


Chocolate lover's cookies:



साहित्य: 2 टीस्पून कोको पावडर,  2 टेबलस्पून chocolate chips 
कृती: 
  • मैदा आणि बेकिंग पावडर बरोबर कोको पावडरही तीनदा चाळून घ्या. (यात अर्धा टीस्पून कॉफी पावडर घातली तर त्याची कडसर चव मस्त लागते.)  वरील कृतीनुसार भाग 1 करा. तयार झालेल्या मिश्रणात chocolate chips टाका आणि हलक्या हाताने cut and fold पद्धतीने मिसळा.
  • मिश्रणाचे गोळे करून किंचित चपटे करा आणि त्यावर chocolate chips लावा. हलक्या हाताने किंचित दाबा. पुढची कृती भाग 2 नुसार करा.


Coconut cookies:






साहित्य: 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कीस  
कृती: 
  • सुक्या खोबऱ्याचा कीस मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत परता.
  • वरील कृतीनुसार भाग 1 करा. तयार झालेल्या मिश्रणात खोबऱ्याचा भाजलेला कीस टाका आणि हलक्या हाताने cut and fold पद्धतीने मिसळा.
  • मिश्रणाचे गोळे करून किंचित चपटे करा आणि त्यावर थोडा खोबऱ्याचा कीस लावा. हलक्या हाताने किंचित दाबा. पुढची कृती भाग 2 नुसार करा. 


Coffee cookies:



साहित्य: 1 टीस्पून instant कॉफी पावडर.
कृती: 
  • मैदा आणि बेकिंग पावडर बरोबर instant कॉफी पावडरही तीनदा चाळून घ्या. वरील कृतीनुसार भाग 1 करा. 
  • पुढची कृती भाग 2 नुसार करा. 


Cinnamon cookies:



साहित्य: 1/4 टीस्पून दालचिनी पावडर, साखर.
कृती: 
  • मैदा आणि बेकिंग पावडर बरोबर दालचिनी पावडरही तीनदा चाळून घ्या. वरील कृतीनुसार भाग 1 करा. 
  • मिश्रणाचे गोळे करून किंचित चपटे करा आणि त्यावर थोडी साखर भुरभुरा. हलक्या हाताने किंचित दाबा. पुढची कृती भाग 2 नुसार करा. (साखरेमुळे cookie चा वरचा भाग कुरकुरीत लागतो.)


Dry fruits and nuts cookies:



साहित्य: बेदाणे, मनुका, सुके अंजीर, cranberries, जर्दाळू यासारखे कोणतेही dry fruits आणि काजू, बदाम, अक्रोड, pecan यासारखे कोणतेही nuts.
कृती: 
  • वरील कृतीनुसार भाग 1 करा. तयार झालेल्या मिश्रणात dry fruits आणि nuts टाका आणि हलक्या हाताने cut and fold पद्धतीने मिसळा.
  • मिश्रणाचे गोळे करून किंचित चपटे करा आणि त्यावर थोडा सुकामेवा लावा. हलक्या हाताने किंचित दाबा. पुढची कृती भाग 2 नुसार करा. 


Crunchy golden brown cookies:


साहित्य: 1 कप corn flakes  


कृती: 

  • वरील कृतीनुसार भाग 1 करा. 
  • corn flakes चा चुरा करा. मिश्रणाचे गोळे करून किंचित चपटे करा आणि ते corn flakes च्या चुऱ्यात घोळवा. चिकटलेला चुरा हलक्या हाताने किंचित दाबा. पुढची कृती भाग 2 नुसार करा. 


Caramel rice flakes cookies:

     


    


साहित्य: 1 कप पातळ पोहे, 1 टेबलस्पून साखर, 1 टीस्पून लोणी.         
कृती: 
  • पातळ पोहे हलके भाजून जर कुरकुरीत करा.
  • एका कढईत लोणी टाका. ते वितळले की त्यात साखर घाला आणि सतत हलवत रहा. या मिश्रणाला सोनेरी रंग आला की त्यात भाजलेले पोहे टाका आणि नीट हलवून साखरेचे मिश्रण पोह्याला सगळीकडे सारखे लावून घ्या. पोहे एकमेकांना चिकटले तर जरा चुरा करा.
  • वरील कृतीनुसार भाग 1 करा. 
  • मिश्रणाचे गोळे करून किंचित चपटे करा आणि ते पोह्याच्या चुऱ्यात घोळवा. चिकटलेला चुरा हलक्या हाताने किंचित दाबा. पुढची कृती भाग 2 नुसार करा. 


Jam sandwich cookies:



साहित्य: कोणत्याही प्रकारचा जॅम. 
कृती: 
  • वरील कृतीनुसार भाग 1 करा. 
  • मिश्रणाचे गोळे करून किंचित चपटे करा. अर्ध्या गोळ्यांना बोटानी मध्ये भोक पाडा. पुढची कृती भाग 2 नुसार करा. 
  • तयार cookies पूर्ण थंड होऊ द्या. मध्ये भोक नसलेल्या cookies च्या खालच्या सपाट भागावर जॅम पसरा आणि भोक असलेल्या cookies त्यावर ठेवा. मधल्या भोकातून रंगीत जॅम मस्त दिसतो.


Ice cream sandwich cookies:





साहित्य: कोणत्याही प्रकारचे ice cream . 

कृती: 
  • वरील कृतीनुसार भाग 1 करा. 
  • मिश्रणाचे गोळे करून किंचित चपटे करा. अर्ध्या गोळ्यांना बोटानी मध्ये भोक पाडा. पुढची कृती भाग 2 नुसार करा. 
  • तयार cookies पूर्ण थंड होऊ द्या. मध्ये भोक नसलेल्या cookies च्या खालच्या सपाट भागावर ice cream चा जाड थर पसरा आणि भोक असलेल्या cookies त्यावर ठेवा. मधल्या भोकातून ice cream दिसेल. 
  • अशी ice cream sandwichs तयार करून फ्रीझर मध्ये ठेवा. हे नुसते तर खाता येतेच पण यावर जेली, फळांचे तुकडे टाकले तर याचे मस्त dessert तयार होते. 


Bear cookie pops:




साहित्य: ice cream च्या काड्या, icing, गोळ्या, फळांचे तुकडे असे डेकोरेशनचे साहित्य.

कृती: 
  • वरील कृतीनुसार भाग 1 करा. 
  • प्रत्येक cookie pop साठी मिश्रणाचा 1 मोठा आणि 2 छोटे असे गोळे करून किंचित चपटे करा. छोटे गोळे मोठ्या गोळ्याला लागून एकमेकांपासून थोड्या अंतरावर ठेवा. हे अस्वलाचे कान होतील. 
  • मोठ्या गोळ्यामधे  खालच्या बाजूनी ice cream ची काडी खुपसा.
  •  पुढची कृती भाग 2 नुसार करा. 
  • तयार cookies पूर्ण थंड होऊ द्या. मग त्यावर icing, गोळ्या, फळांचे तुकडे यांच्या सहाय्यानी अस्वलाचे तोंड, नाक, डोळे काढा आणि हवे तसे सजवा. 
  • लहान मुलांच्या पार्टीसाठी हे करता येतात. 

Friday, January 18, 2013

'सूप' र one dish meal

     संध्याकाळची वेळ असते. आपण नुकतेच ऑफिस मधून किंवा दुकानातून नेहमीची खरेदी करून आलेलो असतो. वाटेत गर्दी आणि चिक्कार ट्राफिक लागलेला असतो. आपण पुरते दमलेलो असतो आणि खूप भूक लागलेली असते. आता यापुढे नेहमीचा सगळा स्वयंपाक करण्याएवढा वेळ नाही त्यामुळे पटकन मुगाच्या डाळीची खिचडीच खावी लागणार. म्हणून आपण तयारी करायला लागणार तेवढ्यात मनात विचार येतो, "आत्ता मस्त पनीर माखनवाला किंवा बटर चिकन खायला काय मज्जा येईल." एवढ्या एका विचाराने आपण त्या चविष्ट ग्रेव्हीच्या आठवणीत पुरते रंगून जातो. त्याची ती आंबट आणि गोडसर चव, मस्त लुसलुशीत आणि सुंदर स्वाद असलेलं पनीर किंवा चिकन आणि ग्रेव्ही मधला तो creaminess याच्या आठवणीनी तोंडाला पाणी सुटतं. "सारखं हॉटेलचं खाऊन कंटाळा आलाय. खरतर घरात सगळं समान आहे पण आत्ता बनवायला कितीतरी वेळ लागेल. परत त्याबरोबर रोटी, पोळ्या, भात काहीतरी करावं लागणार. एवढा वेळ आत्ता नाहीये." आपण एक उसासा टाकतो, नजरेसमोर तरळणाऱ्या त्या चवदार ग्रेव्ही वर मनातल्या मनात काट मारतो आणि परत खिचडीकडे वळतो. अशाच एका संध्याकाळी हा पदार्थ करण्याची 'सूप' ीक कल्पना माझ्या डोक्यात आली. 
     इथे अमेरिकेत देशोदेशीच्या पदार्थांची restaurants आहेत. त्या देशातल्या त्या विशिष्ठ चवी जपणारे पदार्थ जसे मिळतात तसेच दोन देशातल्या अगदी भिन्न चवी एकत्र करून पूर्णतः नवीनच बनवलेले पदार्थही मिळतात. मेक्सिकन पिझ्झा, सीख कबाब wrap, थाई पिझ्झा यासारखे पदार्थ हे आता नक्की कोणत्या देशाचे हे ठरवणं आवघड आहे. याच प्रकारात मोडणारा चिकन टिक्का मसाला सूप हा पदार्थ एका ठिकाणी खाल्ला आणि तो खूपच आवडला. एकदा बटर चिकनची आठवण आलेली असताना shortcut म्हणून केला आणि त्या पदार्थाच्या मी प्रेमातच पडले. त्यानंतर कित्येकदा मी हे सूप केले आणि त्यात अनेक प्रयोग करून त्याची एक स्वतंत्र रेसिपी तयार केली. यात बटर चिकन चे सूपांतर झाले आहे :) म्हणालं तर तशीच चव पण म्हणालं तर अगदी वेगळी. म्हणालं तर सूप पण नुसतं प्यायच्या ऐवजी ते खाताही येतं. सूप नी जेवण चालू करा आणि शेवटपर्यंत सूपच खात राहा. आत्तापर्यंत तुमची उत्सुकता अगदी शिगेला पोचली असणार. "काय आहे तरी काय हे सूप नक्की? नुसतंच तोंडाला केव्हाचं पाणी सुटतंय!" चला, याची रेसिपी बघूया.



साहित्य:
200 ग्रॅम चिकन, 1 कप tomato प्युरी, 1/4 कप तांदूळ, 1 1/2 कप चिरलेल्या भाज्या (ढब्बू मिरची, मक्याचे दाणे, मटार, गाजर, लाल भोपळा, फ्लॉवर, मशरूम यापैकी किंवा अजून इतरही) 2 मध्यम तिखट हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून आलं पेस्ट, अर्धा टीस्पून लिंबाचा रस, 1 टेबलस्पून लोणी, 3-4 वेलदोडे, 1 टीस्पून कसूरी मेथी, 2.5 कप चिकन broth, पाव कप दूध, 2 1/4 कप पाणी (चिकन broth, दूध, पाणी मिळून साधारण 5 कप) साखर, मीठ चवीनुसार.

(यात चिकन ऐवजी पनीर घालता येते. शिवाय मोडाची कडधान्येही मस्त लागतात. तसेच चिकन broth ऐवजी vegetable stalk घालता येईल.)


कृती:
  • चिकनचे लांब, बारीक तुकडे करून त्याला लिंबाचा रस, आलं, मिरची पेस्ट आणि मीठ लावून 15 -20 मिनिटे marinate करा. एका कढईत थोड्याशा तेलात लोणी घाला (असे केल्यामुळे लोणी जळत नाही) आणि त्यात चिकन घालून अर्धवट शिजेपर्यंत परतून घ्या. चिकन बाऊल मध्ये काढून घ्या. 
  • एकीकडे चिकन broth आणि पाणी उकळत ठेवा. 
  • कढईत परत थोड्याशा तेलात लोणी घाला आणि त्यात आलं, मिरची पेस्ट, वेलदोडे फोडून घाला. त्यात धुतलेले तांदूळ घाला आणि तांदूळ हलके होईपर्यंत परता. 
  • त्यात चिरलेल्या भाज्या घालून थोडेसे परता. मग tomato प्युरी घालून 1 मिनिट परता. त्यात उकळलेला चिकन broth आणि पाणी घाला. साखर, मीठ घालून चांगले ढवळा. 
  • तांदूळ शिजत आले की त्यात कसूरी मेथी घाला. (कसूरी मेथी तव्यावर किंचित गरम करून घातली तर त्याची हातानी बारीक पावडर करता येते.) मिश्रणात दूध घाला. एकीकडे सतत ढवळत राहा म्हणजे दूध फुटणार नाही. यात हवे असल्यास दुधाबरोबर थोडे क्रीम पण घालू शकता. यात शिजलेले चिकन घालून 2 मिनिटे उकळा. 
  • बाऊलमध्ये घेतल्यावर वरून थोडे लोणी घाला आणि गरम गरम खा / प्या.

   

   
   
     पहिला चमचा तोंडात घातल्याबरोबरच मस्त आंबट गोड चव लागते आणि दूध घातल्यामुळे सूपला creamy, silky texture येतं. चिकन broth आणि अनेक वेगवेगळ्या भाज्या यामुळे सूपची लज्जत काय वाढते म्हणून सांगू. कसूरी मेथी, वेलदोडा यामुळे अगदीच बटर चिकन सारखी चव लागते. पण हे सूप नेहमीच्या बटर चिकन पेक्षा किती तरी सोप्या पद्धतीनी आणि पटकन होतं. सूपमध्ये तांदूळ घातल्यामुळे त्याला आपसूकच थोडा thickness येतो आणि प्रत्येक घासात भात, भाज्या, चिकन असं दाताखाली येऊन मजाच येते. चिकन broth आणि भाज्या घातलेल्या पाण्यातच भात शिजत असल्यामुळे भाताला खूप छान चव येते. मात्र यातला भात अगदी जरुरीपुरातच शिजायला हवा म्हणजे तो तसाच अख्खा राहतो आणि सूप मधल्या नूडल्स सारखा लागतो. शिवाय त्याबरोबरच्या भाज्याही अर्ध्याकच्च्या शिजतात आणि जास्त छान लागतात. 
     या सूप मध्ये तांदूळ, भाज्या आणि पाणी, चिकन broth, दूध सगळ्या घटकांचे प्रमाण अतिशय महत्वाचे आहे. ते प्रमाण बदलले तर 'सूप' ऐवजी भात घातलेल्या भाज्या किंवा tomato घातलेला भात किंवा दुधात शिजवलेल्या भाज्या अशा प्रकारचे काहीही लागू शकते. मी या सूपचे अनेक प्रयोग केले हे आधीच सांगितलेले असल्यामुळे हे स्वानुभवाचे बोल आहेत हे आता उघड आहे :)
     आणि आता या सूपबद्दलचं एक गुपित !!! हे अतिशय healthy आहे. गुपित अशासाठी की healthy पदार्थ म्हणजे नुसत्या उकडलेल्या भाज्या किंवा पौष्टिक धान्य घातलेला एक अत्यंत बेचव पदार्थ अशी आपली समजूत असते. पण जर असा पदार्थ अतिशय पौष्टिक आणि तरीही खूप चवदार, नाविन्यपूर्ण आणि झटपट होणारा असेल तर आपण त्याच्या मोहात नाही पडलो तरच नवल.
     तुम्हीही हे सूप करून बघा आणि त्याचा मस्त आस्वाद घ्या. अजूनही अनेक चविष्ट, खमंग, रुचकर आणि जिभेचे चोचले पुरवणाऱ्या पदार्थांसाठी माझा blog (http://malavikaskitchen.blogspot.com/) वाचत राहा.