Friday, January 18, 2013

'सूप' र one dish meal

     संध्याकाळची वेळ असते. आपण नुकतेच ऑफिस मधून किंवा दुकानातून नेहमीची खरेदी करून आलेलो असतो. वाटेत गर्दी आणि चिक्कार ट्राफिक लागलेला असतो. आपण पुरते दमलेलो असतो आणि खूप भूक लागलेली असते. आता यापुढे नेहमीचा सगळा स्वयंपाक करण्याएवढा वेळ नाही त्यामुळे पटकन मुगाच्या डाळीची खिचडीच खावी लागणार. म्हणून आपण तयारी करायला लागणार तेवढ्यात मनात विचार येतो, "आत्ता मस्त पनीर माखनवाला किंवा बटर चिकन खायला काय मज्जा येईल." एवढ्या एका विचाराने आपण त्या चविष्ट ग्रेव्हीच्या आठवणीत पुरते रंगून जातो. त्याची ती आंबट आणि गोडसर चव, मस्त लुसलुशीत आणि सुंदर स्वाद असलेलं पनीर किंवा चिकन आणि ग्रेव्ही मधला तो creaminess याच्या आठवणीनी तोंडाला पाणी सुटतं. "सारखं हॉटेलचं खाऊन कंटाळा आलाय. खरतर घरात सगळं समान आहे पण आत्ता बनवायला कितीतरी वेळ लागेल. परत त्याबरोबर रोटी, पोळ्या, भात काहीतरी करावं लागणार. एवढा वेळ आत्ता नाहीये." आपण एक उसासा टाकतो, नजरेसमोर तरळणाऱ्या त्या चवदार ग्रेव्ही वर मनातल्या मनात काट मारतो आणि परत खिचडीकडे वळतो. अशाच एका संध्याकाळी हा पदार्थ करण्याची 'सूप' ीक कल्पना माझ्या डोक्यात आली. 
     इथे अमेरिकेत देशोदेशीच्या पदार्थांची restaurants आहेत. त्या देशातल्या त्या विशिष्ठ चवी जपणारे पदार्थ जसे मिळतात तसेच दोन देशातल्या अगदी भिन्न चवी एकत्र करून पूर्णतः नवीनच बनवलेले पदार्थही मिळतात. मेक्सिकन पिझ्झा, सीख कबाब wrap, थाई पिझ्झा यासारखे पदार्थ हे आता नक्की कोणत्या देशाचे हे ठरवणं आवघड आहे. याच प्रकारात मोडणारा चिकन टिक्का मसाला सूप हा पदार्थ एका ठिकाणी खाल्ला आणि तो खूपच आवडला. एकदा बटर चिकनची आठवण आलेली असताना shortcut म्हणून केला आणि त्या पदार्थाच्या मी प्रेमातच पडले. त्यानंतर कित्येकदा मी हे सूप केले आणि त्यात अनेक प्रयोग करून त्याची एक स्वतंत्र रेसिपी तयार केली. यात बटर चिकन चे सूपांतर झाले आहे :) म्हणालं तर तशीच चव पण म्हणालं तर अगदी वेगळी. म्हणालं तर सूप पण नुसतं प्यायच्या ऐवजी ते खाताही येतं. सूप नी जेवण चालू करा आणि शेवटपर्यंत सूपच खात राहा. आत्तापर्यंत तुमची उत्सुकता अगदी शिगेला पोचली असणार. "काय आहे तरी काय हे सूप नक्की? नुसतंच तोंडाला केव्हाचं पाणी सुटतंय!" चला, याची रेसिपी बघूया.



साहित्य:
200 ग्रॅम चिकन, 1 कप tomato प्युरी, 1/4 कप तांदूळ, 1 1/2 कप चिरलेल्या भाज्या (ढब्बू मिरची, मक्याचे दाणे, मटार, गाजर, लाल भोपळा, फ्लॉवर, मशरूम यापैकी किंवा अजून इतरही) 2 मध्यम तिखट हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून आलं पेस्ट, अर्धा टीस्पून लिंबाचा रस, 1 टेबलस्पून लोणी, 3-4 वेलदोडे, 1 टीस्पून कसूरी मेथी, 2.5 कप चिकन broth, पाव कप दूध, 2 1/4 कप पाणी (चिकन broth, दूध, पाणी मिळून साधारण 5 कप) साखर, मीठ चवीनुसार.

(यात चिकन ऐवजी पनीर घालता येते. शिवाय मोडाची कडधान्येही मस्त लागतात. तसेच चिकन broth ऐवजी vegetable stalk घालता येईल.)


कृती:
  • चिकनचे लांब, बारीक तुकडे करून त्याला लिंबाचा रस, आलं, मिरची पेस्ट आणि मीठ लावून 15 -20 मिनिटे marinate करा. एका कढईत थोड्याशा तेलात लोणी घाला (असे केल्यामुळे लोणी जळत नाही) आणि त्यात चिकन घालून अर्धवट शिजेपर्यंत परतून घ्या. चिकन बाऊल मध्ये काढून घ्या. 
  • एकीकडे चिकन broth आणि पाणी उकळत ठेवा. 
  • कढईत परत थोड्याशा तेलात लोणी घाला आणि त्यात आलं, मिरची पेस्ट, वेलदोडे फोडून घाला. त्यात धुतलेले तांदूळ घाला आणि तांदूळ हलके होईपर्यंत परता. 
  • त्यात चिरलेल्या भाज्या घालून थोडेसे परता. मग tomato प्युरी घालून 1 मिनिट परता. त्यात उकळलेला चिकन broth आणि पाणी घाला. साखर, मीठ घालून चांगले ढवळा. 
  • तांदूळ शिजत आले की त्यात कसूरी मेथी घाला. (कसूरी मेथी तव्यावर किंचित गरम करून घातली तर त्याची हातानी बारीक पावडर करता येते.) मिश्रणात दूध घाला. एकीकडे सतत ढवळत राहा म्हणजे दूध फुटणार नाही. यात हवे असल्यास दुधाबरोबर थोडे क्रीम पण घालू शकता. यात शिजलेले चिकन घालून 2 मिनिटे उकळा. 
  • बाऊलमध्ये घेतल्यावर वरून थोडे लोणी घाला आणि गरम गरम खा / प्या.

   

   
   
     पहिला चमचा तोंडात घातल्याबरोबरच मस्त आंबट गोड चव लागते आणि दूध घातल्यामुळे सूपला creamy, silky texture येतं. चिकन broth आणि अनेक वेगवेगळ्या भाज्या यामुळे सूपची लज्जत काय वाढते म्हणून सांगू. कसूरी मेथी, वेलदोडा यामुळे अगदीच बटर चिकन सारखी चव लागते. पण हे सूप नेहमीच्या बटर चिकन पेक्षा किती तरी सोप्या पद्धतीनी आणि पटकन होतं. सूपमध्ये तांदूळ घातल्यामुळे त्याला आपसूकच थोडा thickness येतो आणि प्रत्येक घासात भात, भाज्या, चिकन असं दाताखाली येऊन मजाच येते. चिकन broth आणि भाज्या घातलेल्या पाण्यातच भात शिजत असल्यामुळे भाताला खूप छान चव येते. मात्र यातला भात अगदी जरुरीपुरातच शिजायला हवा म्हणजे तो तसाच अख्खा राहतो आणि सूप मधल्या नूडल्स सारखा लागतो. शिवाय त्याबरोबरच्या भाज्याही अर्ध्याकच्च्या शिजतात आणि जास्त छान लागतात. 
     या सूप मध्ये तांदूळ, भाज्या आणि पाणी, चिकन broth, दूध सगळ्या घटकांचे प्रमाण अतिशय महत्वाचे आहे. ते प्रमाण बदलले तर 'सूप' ऐवजी भात घातलेल्या भाज्या किंवा tomato घातलेला भात किंवा दुधात शिजवलेल्या भाज्या अशा प्रकारचे काहीही लागू शकते. मी या सूपचे अनेक प्रयोग केले हे आधीच सांगितलेले असल्यामुळे हे स्वानुभवाचे बोल आहेत हे आता उघड आहे :)
     आणि आता या सूपबद्दलचं एक गुपित !!! हे अतिशय healthy आहे. गुपित अशासाठी की healthy पदार्थ म्हणजे नुसत्या उकडलेल्या भाज्या किंवा पौष्टिक धान्य घातलेला एक अत्यंत बेचव पदार्थ अशी आपली समजूत असते. पण जर असा पदार्थ अतिशय पौष्टिक आणि तरीही खूप चवदार, नाविन्यपूर्ण आणि झटपट होणारा असेल तर आपण त्याच्या मोहात नाही पडलो तरच नवल.
     तुम्हीही हे सूप करून बघा आणि त्याचा मस्त आस्वाद घ्या. अजूनही अनेक चविष्ट, खमंग, रुचकर आणि जिभेचे चोचले पुरवणाऱ्या पदार्थांसाठी माझा blog (http://malavikaskitchen.blogspot.com/) वाचत राहा.