कुठल्याही पद्धतीने बनवलेलं चिकन हा मला वाटतंय माझा all time favorite पदार्थ आहे. जेवणात चिकन असलं की बहुतेक माझं मांजरात रुपांतर होत असावं. मांजरासाराखीच मी अगदी मन लावून खाते, ताटच काय तर चिकन शिजवलेलं भांडही चाटून पुसून स्वच्छ करते, खुशीनी बहुदा नसलेली शेपूटही हलत असावी आणि जेवण झाल्यावर तसाच एक तृप्त भाव माझ्या चेहेऱ्यावरही झळकत असावा.
लहानपणी मी नेहमीचं जेवण कसबसं खायचे आणि जेवताना, "अगं पटपट जेव. जेवणाकडे जरा लक्ष दे. केवढसं खातेस." हे संवाद ऐकावे लागायचे. तेव्हा महिन्यातून एखाद्यावेळी चिकनचा बेत ठरलेला असायचा. आधीपासूनच या वेळी कशा प्रकारे बनवायचं ही ठरावा ठरावी व्हायची आणि चिकन बनवलं जायचं. त्यावेळचं जेवण मात्र कोणीही न सांगता अगदी व्यवस्थित व्हायचं.
त्यावेळी वाईला हॉटेल नसल्यामुळे जे काही नवीन खायचं ते घरीच बनवलं जायचं. खूप नवीन रेसिपी करून बघायचो, वेगवेगळे प्रयोग करायचो. नंतर पुण्याला एकदा हॉटेल मध्ये बटर चिकन खाल्लं आणि त्या पदार्थाच्या मी प्रेमात पडले. त्यानंतरही हॉटेल मध्ये खायचं असेल तर एक बटर चिकन मागवायलाच पाहिजे असा अलिखित नियम झाला. मला वाटतं चिकन खाणाऱ्या सगळ्यांचीच हॉटेल मध्ये गेल्यावर बटर चिकन ही पहिली निवड असते. त्याची ती आंबट आणि गोडसर चव, अगदी योग्य प्रमाणात पडलेल्या मसाल्यांचा स्वाद, मस्त शिजलेलं आणि वेगळाच सुंदर स्वाद असलेला चिकन आणि ग्रेव्ही मधला तो creaminess याचा मोह सगळ्यांनाच पडतो.
ते चिकन इतकं आवडलं होतं की तसं घरी करण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला गेला. दर वेळी चिकन मस्त व्हायचं पण ती जी चव डोक्यात होती नेमक्या तशा चवीचं मात्र कधी जमलं नाही. तेव्हा विचार केला की याची काहीतरी अवघड रेसिपी असणार तेव्हा हा पदार्थ बहुतेक नेहमी हॉटेल मधेच खावा लागणार. अगदी अचानक एकदा संजीव कपूरची बटर चिकनची रेसिपी बघण्यात आली. म्हणलं करून तर बघूया..... आणि काय आश्चर्य ते बटर चिकन अगदी जसं पूर्वी खाल्लं होतं तसच बनलं. आणि सर्वात गम्मत म्हणजे त्याची रेसिपी अतिशय सोपी होती. ती करताना 2-3 अशा क्रिया केल्या होत्या की ज्या आधी अजिबात माहित नव्हत्या आणि त्यामुळेच त्याला त्याची अशी ती स्पेशल चव येत होती. त्यामुळे आता घरी बनवलेलं बटर चिकन हे हॉटेल पेक्षाही छान बनतं अशा निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत.
तुम्हीही या रेसिपीनी बटर चिकन घरी करून बघा. मला खात्री आहे की तुम्हीही स्वतःला 'हॉटेलपेक्षाही छान बनवणारा / बनवणारी ' असं certificate देऊन टाकाल.
साहित्य:
500 ग्रॅम बोनलेस चिकन, पाऊण वाटी दही, 1 इंच आलं, 2 पाकळ्या लसूण, 2 टी स्पून लिंबाचा रस, 1/2 टी स्पून गरम मसाला पावडर, 1/2 टी स्पून काश्मिरी लाल तिखट (हे कमी तिखट आणि रंगाने खूप लाल असते. हे नसेल तर साधे लाल तिखट कमी प्रमाणात घाला.), 1 टेबल स्पून तेल (मोहरीचे असल्यास चांगला स्वाद येतो.), मीठ.
ग्रेव्ही साठी: 2-3 tomato, 2 टी स्पून लोणी, 2 टी स्पून आलं लसूण पेस्ट, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1/4 टी स्पून कसुरी मेथी, 1/4 टी स्पून गरम मसाला पावडर , 1 टी स्पून अख्खा गरम मसाला (लवंग, वेलदोडे, दालचिनी, काळी मिरी), 1 टेबलस्पून मध किंवा साखर, 1 वाटी क्रीम, मीठ.
कृती:
- चिकनचे छोटे तुकडे करून घ्या. त्यात तिखट, मीठ आणि लिंबाचा रस टाका आणि नीट चोळून घ्या. हे चिकन अर्धा तास ठेवून द्या.
- एखाद्या पातळ कापडात दही बांधा आणि 20 मिनिटे टांगून ठेवा. यामुळे दह्यातील पाणी गळून जाईल आणि घट्ट चक्का तयार होईल.
- चक्क्यात तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला पावडर, तेल घाला आणि मिसळून घ्या. हे मिश्रण चिकनला नीट लावून घ्या आणि चिकन 3-4 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. (फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे चिकनला पाणी सुटत नाही.)
- tomato गरम पाण्यात 5 मिनिटे उकळा आणि ते थंड झाले की मिक्सर मधून काढून त्याची प्युरी बनवा.
- ओव्हन 10 मिनिटे 200deg C (400deg F) ला preheat करा. चिकन ओव्हनच्या लाकडी किंवा लोखंडी सळयांना लावा. (लाकडी सळया वापरणार असाल तर त्या आधी अर्धा तास पाण्यात भिजवून घ्या नाहीतर त्या ओव्हन मध्ये जळू शकतात.) चिकन 12 -15 मिनिटे बेक करा. चिकन शिजत आले की त्यावर लोणी लावा आणि परत 2 मिनिटे बेक करा. त्यानंतर ओव्हनमधून काढून ठेवा नाहीतर ते खूप कोरडे होते.
- एका कढईत किंचित तेल घ्या आणि त्यावर लोणी टाका. (तेलात लोणी टाकल्याने लोणी जळत नाही.) त्यात अख्खा गरम मसाला टाका. मग त्यात आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून किंचित परता. त्यात tomato प्युरी, गरम मसाला पावडर, मीठ, हवे असल्यास तिखट, पाऊण कप पाणी घाला आणि चांगले उकळा. gas बारीक करून अजून 5 मिनिटे उकळा. (हॉटेलमध्ये या ग्रेव्हीत लाल रंग घालतात. पण असा कृत्रिम रंग खाणे फारसे चांगले नाही. शिवाय पिकलेले tomato आणि काश्मिरी लाल तिखट वापरले असेल तर ग्रेव्हीला मुळात चांगला लाल रंग येतो.)
- कसुरी मेथी तव्यावर किंचित गरम करून घ्या आणि त्याचा हाताने चुरा करून ग्रेव्ही मध्ये टाका. मध किंवा साखर घाला. यात चिकनचे भाजलेले तुकडे टाकून 2-3 मिनिटे शिजवा. अगदी शेवटी फ्रेश क्रीम घालून मिक्स करा. (क्रीम घालून फार शिजवू नका. ग्रेव्हीच्या आंबटपणामुळे क्रीम फाटू शकते.)
- बाऊलमध्ये घेऊन त्यावर थोडे क्रीम आणि कोथिंबीर टाका. पोळी, नान, पराठा किंवा भात याबरोबर बटर चिकनवर मस्त ताव मारा.
खरतर या अशा इतक्या सोप्या पदार्थाला त्याची अशी विशिष्ट चव येते ती कसुरी मेथी मुळे. शिवाय यात आधीच ओव्हनमध्ये भाजलेले चिकन टाकल्यामुळे त्या चिकनलाही मस्त खरपूस चव लागते. ग्रेव्ही मधला tomato चा आंबटपणा, मध / साखरेची गोडसर चव आणि क्रीममुळे आलेले silky texture यांनी तर रंगत अजूनच वाढते. चला तर मग लगेचच बनवायच्या तयारीला लागा.