Tuesday, June 24, 2014

Grilling

     भारतात राहून आपल्याला ऊन असणारा ऊबदार दिवस याचे फारसे महत्व नसते. वर्षातला अनेक काळ अशा प्रकारचे किंवा खरं तर अतिशय गरम हवामान असल्यामुळे आपण त्यात काही विशेष मनात नाही. पण अमेरिकेत मात्र अशा प्रकारचा दिवस उजाडला की लोकं वेड्यासारखी खुश होतात. रस्त्यावर, दुकानात कोणी अनोळखी माणसे भेटली तरी एकमेकांशी फक्त एवढ्याच विषयावर बोलतात. मी अमेरिकेत पहिल्यांदा मार्च महिन्यात आले आणि त्यानंतर थोड्याच दिवसात हवा एकदम मस्त झाली. आणि मग उन्हाळा चालू झाला. तेव्हा गरम हवेसाठी वेड्या होणाऱ्या लोकांकडे बघून मला गंमत वाटायची. वाटायचे, "त्यात काय एवढे !!!" मग त्यानंतर मी एक हिवाळा इथे काढला आणि "Ohh !!! What a wonderful sunny day!" याचा अर्थ मला पुरता कळला. वर्षातला बराच काळ कडाक्याच्या थंडीत काढल्यावर त्या उन्हाळ्याचे एवढे कौतुक नाही केले तरच नवल. त्यामुळे अमेरिकेतली लोकं उन्हाळ्यात शक्य तितका वेळ घराबाहेर घालवतात. अचानक बागांमधे लोकांचे थवेच्या थवे दिसायला लागतात. फिरणे, पोहणे, ट्रीपला जाणे, camping करणे, बोटीतून फिरणे, मासे पकडायला जाणे यासारखे अनेक उद्योग इथे उन्हाळ्यात सुट्टीच्या दिवशी चालतात. या सगळ्यातला अजून एक अत्यंत महत्वाचा उद्योग म्हणजे Grilling किंवा Barbecue.
     इथे बहुतेक सगळ्या पार्क मधे grills लावलेल्या असतात. आपण कच्चे पदार्थ आणि कोळसा घेऊन गेलं की grilling करता येतं. तिथे जवळपासच बसायला bench, table, शिवाय नंतर गरम कोळसे टाकायला वेगळे पिंप अशाप्रकारची सगळी सोय असते. बऱ्याच लोकांकडे स्वतःच्याही grills असतात. मग त्या कधी बागेत, समुद्रकिनारी नेऊन किंवा मग अगदी घराच्या मागच्या मोकळ्या जागेत, बाल्कनी मधे मांडून लोकं त्याची मजा लुटतात. उन्हाळ्यात बागेत फिरायला गेलं तरी कुठूनतरी धूराचा आणि भाजल्या जाणाऱ्या पदार्थांचा खरपूस वास येतो.
     हा प्रकार साधारण आपल्याकडच्या हुरडा पार्टी सारखा. म्हणजे सगळ्या मित्रपरिवारानी एकत्र येउन बाहेर मोकळ्यात जेवायचं. असे grilling केलेले पदार्थ किती रुचकर, खमंग लागतात हे शब्दात वर्णन करून सांगणे फार अवघड आहे. ते खाऊन त्याचा अनुभवच घ्यायला हवा. प्रत्यक्ष आगीवर किंवा कोळशाच्या धगीत भाजलेले ते पदार्थ वरून अतिशय खरपूस आणि त्या गरमा गरम पदार्थाचा चावा घेतल्यावर आतून मऊ, लुसलुशीत, रसाळ आणि खूप स्वादिष्ट!! पदार्थाला चवीपुरतं मीठ आणि इतर मसाले वगैरे लावलं असलं तरी भाजल्यामुळे त्या घटक पदार्थाची मूळ चव जास्त प्रकर्षाने लागते. भाजल्यामुळे त्यात एक प्रकारचा गोडवा येतो. त्यामुळे वरून फार काही न लावलेले पदार्थही केवळ भाजल्यामुळे अप्रतिम लागतात. आणि असे पदार्थ सगळ्या वयाचे लोकं आवडीने खाऊ शकतात. 

     Grilling केलेले पदार्थ इतके मस्त लागण्याची अजूनही काही करणं आहेत. खरं तर अशा प्रकारे बाहेर, मोकळ्या हवेत, निसर्गाच्या सानिध्यात बसून जेवण करण्याने त्या पदार्थांची चव दहा पटींनी वाढते. शिवाय मित्र, मैत्रिणींबरोबर हसत, गप्पा मारत जेवण्यात खरी मजा. मुळात सगळे पदार्थ एकदम तयार होत नसल्याने हळू हळू एकेक पदार्थ जसा भाजला जाईल तसा निवांत, चव घेत खाता येतो. नुसत्या आगीवर भाजलेले पदार्थ मस्त लागतातच पण कोळशावर भाजलेल्या पदार्थांची चव काही औरच! त्याला कोळशाचा इतका मस्त वास लागतो की अशा पदार्थांची चटक नाही लागली तरच नवल.
     Grilling करून खाणे म्हणजे खरं तर 'History repeats' या प्रकारात मोडते. आदिमानवाच्या काळात आगीचा शोध लागल्यावर तोही असेच पदार्थ भाजून खायला लागला तेव्हा त्याला किती मजा आली असेल हे आज आपण अनुभवू शकतो. 

     आम्हाला दोघानाही grilling केलेले पदार्थ अतिशय आवडतात. आम्ही काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पूर्व भागात राहत होतो तिथे हिवाळ्यात बर्फ पडत असल्याने फक्त उन्हाळ्यात grilling करता यायचं. त्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या शेवटी, "आता हे शेवटचे!" असे म्हणून आम्ही अनेकदा grilling केले. आता California मध्ये थंडी बेताची असल्यामुळे आम्ही हिवाळ्यातही grilling करण्याचा माज करतो. 
     पदार्थ भाजून खायचे म्हणाल्यावर आपली गाडी मक्याचे कणीस, वांग्याचे भरीत किंवा फार तर भाकरी, पापड इथेच अडते. आम्ही त्यात वेगवेगळ्या चवींचे तरतऱ्हेचे पदार्थ बनवून बघितले. Grilling करताना अनेक भाज्या, meat, फळं असं भाजल्याने त्यांच्या वेगळ्या चवी आणि पोत यांनी खूप मजा येते. आम्ही बनवलेल्या काही पदार्थांच्या पाककृती मी सांगणार आहे. 


भाज्या:






मशरूम: (Mushrooms)
1. मशरूम अर्धे चिरून त्याचे मोठे तुकडे करा. त्यात थोडसं तेल, मिरपूड, लिंबू, मीठ, ओरेगानो घालून चोळा आणि 15 मिनिटे marinate करा. नंतर grill करा. 
2. Stuffed मशरूम करण्यासाठी मशरूमचे देठ काढा आणि त्याला लिंबू, मीठ लावून 15 मिनिटे marinate करा. सारण करण्यासाठी मक्याचे दाणे, पनीर किंवा मटार अगदी बारीक करून घ्या आणि त्यात तिखट मीठ, गरम मसाला घालून नीट मिसळून घ्या. मशरूमच्या पोकळीमधे सारण भरा आणि grill करा. 

(1. Cut mushrooms in big pieces. Add oil, crushed black pepper, lime juice, salt, oregano and marinate for 15min. Grill it.
2. For stuffed mushrooms, remove mushroom stems and marinate it with salt and lime juice for 15 min. For stuffing, crush corn, peas or Paneer and add chili powder, salt, Garam masala. Stuff this mixture in mushrooms and grill it.) 


Tomato:
छोटे tomato (cherry tomato) असतील तर अख्खे घ्या नाहीतर tomato चे मोठे तुकडे करा. त्याला मीठ, तेल, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली basil ची पानं लावा आणि grill करा. 

(Take cherry tomatoes or cut tomatoes in big pieces. Marinate it with salt, oil, finely chopped garlic, finely chopped basil leaves and grill it.)




कांदा, ढब्बू मिरची, फ्लॉवर: (Onion, green pepper/ capsicum, cauliflower)

या भाज्यांचे मोठे तुकडे करा. त्याला मीठ, लिंबू, गरम मसाला, तिखट लावून 15 मिनिटे marinate करा आणि मग grill करा. 

(Cut these vegetables into big pieces. Marinate it with salt, lime juice, Garam masala, chili powder for 15 min and then grill it.)



Asparagus:

1. Asparagus चे खालचे जाड देठ काढून टाका आणि त्याला तेल, मीठ, मिरपूड चोळा. 15 मिनिटांनी grill करा. 
2. Asparagus ला बारीक चिरलेला लसूण आणि सोया सॉस लावा आणि 15 मिनिटांनी grill करा. 

(1. Remove thick part of Asparagus which is hard to chew. Marinate it with oil, salt, crushed black pepper for 15 min. and grill it.
2. Marinate Asparagus with finely chopped garlic and Soy sauce for 15 min. and grill it.) 








Veg सीख कबाब / कटलेट: (Veg Seekh Kabaab / Cutlet)



एका कढईत तेल गरम करा आणि त्यात आलं पेस्ट, हिरवी मिरची आणि चिरलेल्या भाज्या (गाजर, घेवडा, मटार, कोबी, भोपळा) घालून परता. हे मिश्रण थंड झालं की मिक्सर मधून बारीक करा. कढईत थोडं हरभरा डाळीचे पीठ हलकं भाजा आणि त्यात भाज्यांचे मिश्रण, उकडलेला बटाटा, मीठ, गरम मसाला, मिरपूड घालून नीट मिसळून घ्या. एका सळईवर (Skewer) हे मिश्रण घट्ट दाबून लावा आणि त्यावर aluminium foil गुंडाळा. हे grill वर सगळीकडून भाजा आणि कोथिंबीर, पुदीना चटणीबरोबर खा. 

(Heat oil in a pan and add ginger paste, green chili, and chopped vegetables like carrot, beans, peas, cabbage, pumpkin etc. and saute. When the mixture gets cool grind it. Dry roast chickpea flour and add vegetable mixture, mashed potato, salt, Garam masala, crushed black pepper. Mix it well. Make a roll of a mixture and insert a skewer in it. Roll aluminium foil around it and grill it from all sides. Serve with cilantro / coriander, mint Chutney.)


बटाटे, पनीर, चिकन, फिश, Prawns: 
वरील पदार्थांना खालीलपैकी कोणताही स्वाद चांगला लागतो. 

 

 

तंदूर:
दह्याचा चक्का लावा. त्या घट्ट दह्यात आलं-लसूण पेस्ट, तंदूर मसाला, तिखट, लिंबू, मीठ, तेल, थोडासा गरम मसाला टाका आणि हे मिश्रण घटक पदार्थाला चोळून अर्धा तास marinate करा. नंतर grill करा. 

(Take hung curd in a bowl and add ginger- garlic paste, Tandoor masala, red chili powder, lime juice, salt, oil, very little Garam masala. Marinate ingredients in this mixture for 1/2 hour and then grill it.)


पुदीना चटणी:
पुदीना, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची, लिंबू, मीठ यांची चटणी बनवून घटक पदार्थाला लावा. अर्धा तास marinate करून नंतर grill करा. 

(Take mint leaves, cilantro / coriander leaves, ginger, garlic, green chili, lime juice, salt in a grinder and make a fine paste. Marinate ingredients in this mixture for 1/2 hour and then grill it.)


Hickory sauce / Barbecue sauce:
घटक पदार्थाला यापैकी कुठलाही सॉस आणि लागल्यास थोडेसे मीठ चोळून अर्धा तास marinate करा आणि नंतर grill करा. 

(Marinate ingredients in these sauces for 1/2 hour and grill it.)


Italian herbs: 
घटक पदार्थाला rosemary, oregano, basil, thyme याप्रकारची herbs, मीठ, मिरपूड, तेल चोळा आणि अर्धा तास marinate करा. नंतर grill करा. 

Marinate ingredients in salt, crushed black pepper, oil and herbs like rosemary, oregano, basil, thyme for 1/2 hour and grill it.


Chinese: 
बारीक चिरलेलं आलं-लसूण, सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगार, मीठ, तेल यांचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण घटक पदार्थाला चोळून अर्धा तास marinate करा. नंतर grill करा. 

In a bowl add finely chopped ginger, garlic, Soy sauce, Chili sauce, vinegar, salt, oil and mix it well. Marinate ingredients in this mixture for 1/2 hour and grill it.


Creamy sauce:
क्रीम (किंवा थोडसं दूध), चीज, काजू किंवा बदाम, मिरपूड, मीठ, थोडासा लसूण याची पेस्ट करून ती घटक पदार्थाला लावा. अर्धा तास marinate करून नंतर grill करा. 

Take cashew nuts or almonds, cheese, cream or milk, crushed black pepper, salt, garlic and make a paste. Marinate ingredients in this mixture for 1/2 hour and grill it.


Pesto कटलेट:
बेसिल, बदाम, ऑलिव्ह oil, लसूण, मीठ, मिरपूड हे बारीक वाटून त्यांची चटणी (Pesto) तयार करा. घटक पदार्थाचा बारीक खिमा करून त्यात pesto, चवीनुसार मीठ घाला आणि नीट मिसळून घ्या.  हे मिश्रण 15 मिनिटे marinate करा. त्याचे कटलेट बनवून grill करा. 
ब्रेड भाजून त्याला pesto लावा. त्यावर कटलेट, चीज, grill केलेल्या कांदा, tomato च्या चकत्या ठेवून sandwich बनवा. 

(To make Pesto take basil leaves, almonds / pine nuts, olive oil, garlic, salt, crushed black pepper in a grinder and make fine paste. Grind ingredients and add Pesto, salt and mix it well. Marinate the mixture for 15 min. Make patties and grill them. 
Spread Pesto on a toasted bread slice. Arrange Grilled patty, cheese, grilled slices of onion, tomato and make a sandwich.)




फळं:
अननस, पीच, सफरचंद या फळांचे मोठे तुकडे करून नुसतेच भाजले तरी मस्त लागतात. शिवाय हवे असल्यास त्या तुकड्यांना लिंबू, मीठ, साखर चोळून grill करा. त्यामुळे त्यांच्या चवीत अजूनच रंगत येते. हलकी भाजलेली फळं Vanilla ice cream बरोबरसुद्धा मस्त लागतात. 

(Cut big pieces of fruits like pineapple, peach, apple and grill it as it is. Or marinate it in lime juice, salt and sugar for 5 min and grill it. You can serve it with Vanilla ice cream.)



     या आणि अशासारखे असंख्य पदार्थ तुम्ही grill करू शकता. तुकडे लहान असतील तर skewer वर लावून छान भाजता येतात. शिवाय या सगळ्या भाजलेल्या पदार्थांपासून काही नाविण्यपूर्ण पदार्थही बनवू शकता. म्हणजे  grilling केलेले पदार्थ घालून केलेलं sandwich, भात किंवा सलाड. भाज्या घातलेला भात aluminium foil वर पसरून grill वर ठेवला तर त्याला मस्त धुरावलेला, कोळशाचा वास येतो आणि असा भात अप्रतिम लागतो. अशा या grill केलेल्या मेजावानी बरोबर तुम्ही सूप, ताजी फळं, ice cream खाऊन परिपूर्ण, अत्यंत चविष्ट आणि कमालीच्या पौष्टिक जेवणाची मजा लुटू शकता. तुमच्याकडे grill  नसेल तर हेच सगळे पदार्थ तुम्ही oven किंवा अगदी तव्यावरही करू शकाल. त्यात प्रत्यक्ष आगीवर किंवा कोळशावर भाजल्याची मजा जरी आली नाही तरी ते पदार्थही खूप चवदार लागतात. घरी नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय कळवा. 

Saturday, May 10, 2014

Mother's Day Special - कोथिंबीरीच्या वड्या (Traditional Maharashtrian Cilantro Snack)


     माझ्या आणि मम्माच्या खाण्याबद्दलच्या आठवणी ती मला रोज न कंटाळता जेवायला भरावयाची तेव्हापासूनच्या आहेत. न कंटाळता अशासाठी म्हणाले कारण मी तेव्हा जेवायला सुमारे 1 ते 1.5 तास लावयचे. त्यामुळे मला दूध देणे, जेवण भरवणे हा माम्मासाठी एक मोठा उद्योगाच असायचा. शेजारच्या काकू तर मम्माला म्हणायच्या की, "तिला दूध देण्याआधी तुम्ही स्वतः कपभर दूध पीत जा." मी मुळात खूप सावकाश जेवायचे आणि त्यातून माझ्या बऱ्याच आवडी निवडी होत्या. त्यामुळे "अगं, पटापट खा. रेंगाळू नको. नुसती तंद्री लावून बसू नको." अशी वाक्ये सतत कानावर पडायची. "आवडत असलेला पदार्थ आवडून खायचा आणि आवडत नसलेला पदार्थ न आवडून खायचा" असा आमच्या घरातला नियम होता. तो नियम मलाच सर्वात जास्त जाचक होत असल्यामुळे माझी कुरकुर असायची. या सगळ्यावर उपाय म्हणून मम्मा बरेच नवीन, fancy पदार्थ करायची. ते करताना मला उल्लू बनवण्याची पूर्ण खबरदारी घेतली जायची. म्हणजे कटलेट, पाव भाजीच्या नावाखाली कुठल्याही भाज्या खपवणे, चॉकलेट केक च्या नावाखाली नाचणीचे पीठ घातलेला केक खायला घालणे किंवा वांग्याची मसालेदार भाजी ही कशी veg चीकन असते हे पटवणे असे प्रकार सर्रास व्हायचे. नंतर पुढे माझ्या या सगळ्या सवयी बदलल्या आणि मी सगळं आवडून खायला लगले. पण तरीही जेवतानाची ती सगळी वाक्य बदलली नाहीत. फक्त आता त्या वाक्यात माझ्याऐवजी आरवचं नाव असतं आणि ती वाक्य आता मम्मा ऐवजी मी म्हणते एवढंच. पण मम्माकडून मी जसे उत्तम पदार्थ करायला शिकले तसच मुलाला उल्लू बनवायलाही शिकले असणार. 
     मी आज जे काही पदार्थ बनवते त्यातले बरेचसे मी मम्मा कडून शिकलेले आहे. आणि नुसतेच पदार्थ शिकले असं नाही तर मुळात ते बनवण्याची आवड, त्यातले perfection, त्यासाठी लागणारा सराव, नवीन प्रयोग करून बघण्याची इच्छा हे तिच्याकडून मिळाले आहे. लहानपणी एखादा पदार्थ आज मी करणार असं मी म्हणाल्यावर मला तिनी कधी नुसता तो पदार्थ शिकवला नाही तर त्यासाठी लागणारी तयारी करण्यापासून ते नंतर सगळं जागच्या जागी ठेवून ओटा पुसून घेण्यापर्यंत सगळं मी करावं असा तिचा आग्रह असयचा. आणि एवढं सगळं करूनही परत वेळेत जेवायला वाढलं पाहिजे यासाठी कशा प्रकारे वेळेचं नियोजन करायचं हे सुद्धा तिनी शिकवलं. शिवाय त्या पदार्थात घटक टाकताना चवीबरोबरच पौष्टीकतेचाही विचार केलेला असायचा. त्यामुळे नुसत्या पाककृतीच नाही तर एकूणच पदार्थ बनवण्याची पद्धत आणि त्यामागचा विचार हे सगळच मी नकळत शिकत गेले. 
     माझं सगळ लहानपण वाई मध्ये गेलं. महाबळेश्वरला जाताना वाटेत वाई लागत असल्यामुळे जाता जाता थोड्या वेळासाठी आमच्याकडे डोकावणारे चिक्कार पाहुणे आमच्याकडे येत असतात. अशा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी खायला किंवा जेवायला  काय करायचं याच्या असंख्य कल्पना माम्माकडे आहेत. आणि एकदम बरीच लोकं जेवायला आली आहेत असेही अनेकदा होत असल्याने किती जेवण लागेल याचा खूप चांगला अंदाजही तिला आहे. एकूणच पदार्थ बनवणे आणि लोकांना खायला घालणे तिला अत्यंत आवडते. मी माझ्याकडे इथे अमेरिकेत कोणी येणार असले की आदल्या दिवशी तिला call करून काही ideas घेते. 
     माझ्या लहानपणी वाईत फारशी हॉटेल नव्हती आणि जी होती तिथे आम्ही जाऊन खाऊ शकू इतकी बरी नव्हती. त्यामुळे जे काही वेगळे पदार्थ खायचे आहेत ते मम्मा घरीच बनवायची. आम्ही फर्माइश केलेले नवीन पदार्थ बनवण्यात मम्मा एकदम पटाईत होती. दर रविवारी "काहीतरी वेगळं आणि मस्त" या अटीत बसेल असं बनायचं. आमच्या प्रत्येक वाढदिवसाला खास मेनू तर असायचाच पण शिवाय दरवर्षी माझ्या डोक्यात केक साठी नवीन idea यायची. त्यानुसार मम्मा वेगवेगळ्या आकाराचा केक बनवायची. नंतर ती cake च्या order घ्यायला लागली. कित्येक वर्ष ती खूप विविध आकाराचे आणि theme चे cake बनवून द्यायची. तिच्याबरोबर cake चे icing, decoration करणे हा माझा आवडता छंद होता. कधी tv वर नवीन पदार्थ पहिला की तो मम्मा करून बघयची. त्यामुळे Pizza, Chinese, Sizzler, रुमाली रोटी, पंजाबी भाज्या, चिकन बिर्याणी यासारखे अगणित पदार्थ मी हॉटेलमध्ये खायच्या कितीतरी आधीपासून घरी खात होते. आमच्याकडे काही कार्यक्रम असला की माझ्या मैत्रिणी किंवा मम्माच्या मैत्रिणी या वेळी मम्मानी काय नवीन केलं असेल म्हणून वाट बघायच्या. 
     वाईत हॉटेल नाही म्हणून सगळे पदार्थ घरी करून बघण्याला सुरुवात झाली असली तरी त्याला फक्त हे एकच कारण नव्हतं. घरी आपल्या आवडीनुसार त्या पदार्थाची चव सुधारता येते. त्यात वापरलेले घटक पदार्थ उत्तम दर्जाचे आहेत हे आपल्याला माहीत असतं. पदार्थ सर्वांना पुरेसे आणि स्वस्तात होतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते आपण स्वतः बनवण्याचा आनंद मिळतो. मला आठवतंय की लहानपणी कित्येकदा काही नवीन पदार्थ बनवायचा ठरला की घरातले सगळेजणं त्यात सामील व्हायचे. आधीची मदत करण्यापासून ते नुसतीच लुडबुड करून, अधून मधून वास घेत, अजून शिजलं की नाही ते बघण्यापर्यंत सगळ्या कामात आम्ही सगळे बुडून गेलेलो असयचो. अशा एकत्र घालवलेल्या कित्येक रुचकर संध्याकाळी माझ्या आठवणीत आहेत.
     उन्हाळ्याच्या सुट्टीतसुद्धा वाड्यातले सगळे एकत्र येऊन पापड, कुरडया, पापड्या करायचे तेव्हा खूप मज्जा यायची. याशिवाय मम्मा बेदाणे, बटाट्याचे वेफर्स सुद्ध्या घरी करयची. या सगळ्यात तिला मदत करणे हा माझा अत्यंत आवडत उद्योग होता. 
     अनेक नवीन पदार्थ करून बघणे आणि त्यात प्रयोग करणे हे आमच्या घरात नेहेमी चालू असल्यामुळे काही फसलेल्या प्रयोगांचे गमतीदार किस्सेही आहेत. एकदा मम्मा नुकतीच icecream शिकली होती आणि ते घरी करून बघणार होती. असे नवीन काही करणार म्हणाल्यावर बाबाची प्रयोगशीलता खूपच उफाळून येत असे. (अर्थात त्यातूनच खूप नवीन मस्त पदार्थ बनले हे मान्य करायला हवे.) तर icecream च्या वेगवेगळ्या flavours करून बघू म्हणून बर्फाच्या tray मध्ये प्रत्येक कप्प्यात वेगळ्या चवीचे icecream बनवून सेट करत ठेवले. मुळात icecream खायला मिळणार म्हणून आम्ही खूप टुकत बसलो होतो. आणि त्यातून एवढी वेगवेगळी icecreams केली म्हणाल्यावर तर खूपच खुशीत होतो. खूप वाट बघून शेवटी icecream सेट झाल्यावर खायला घेतलं आणि लक्षात आलं की ते भलतंच घट्ट बनलं आहे. म्हणजे नुसतं गोठून घट्ट नाही तर काहीसं पिठूळ, वडीसारखं. ते खाणं अशक्य होतं म्हणून शेवटी हिरमुसून ते बेसिन मध्ये फेकून दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघतो तर ते icecream बेसिन मध्ये तसंच्या तसंच. ते बघून मात्र आमची हसता हसता पुरेवाट झाली. झालं होतं असं की नेमकं त्यावेळी icecream मध्ये घालण्यासाठी आणलेल्या मिल्क पावडर मध्ये बहुतेक आधीच corn starch घातलेला होता. त्यामुळे icecream चं सगळं प्रमाण बिघडलं आणि त्याचा न वितळणारा घट्ट ठोकळा बनला होता. त्यानंतर अक्षरशः हजारोवेळा अतिशय सुंदर, मुलायम, अनेक वेगळ्या flavours चं icecream अगदी कंटाळा येईपर्यंत खाल्लं आहे. पण त्यावेळच्या फसलेल्या icecream ची आठवण काढत आम्ही अजूनही खूप हसतो. 
     मम्माला खाणे बनवण्याची आणि लोकांना खिलवण्याची जशी हौस आहे तशीच ते लोकांना शिकवण्याची सुद्धा आहे. त्यातूनच तिनी coocking class मधून अनेक विविध प्रकारच्या, देशी, विदेशी, पारंपारिक आणि पूर्णतः आधुनिक, स्वतः शोधून काढलेल्या अशा पाककृती शिकवायला सुरुवात केली. वर्षभर असे classes चालू असले तरी मे महिन्याच्या सुट्टीत ते जोरात चालत. माझ्या त्या classes च्या तर इतक्या मस्त आठवणी आहेत. दुपारी साधारण 1 वाजता हे class असायचे म्हणून त्याच्या आधी आम्ही आमची दुपारची जेवणं आटपायचो. म्हणजे अक्षरशः उगाच थोडसं काहीतरी खाऊन उरकायचो. त्या जेवणात माझं आणि दादाचं लक्षच नसायचं. आणि मग 3 वाजता class संपला आणि सगळे घरी गेले की मग अक्षरशः हॉटेल सारखं हवं ते order करून मस्त ताव मारता यायचा. तेव्हा सुट्टी असली की मी तिच्या कित्येक class मध्ये लुडबुड केलेली आहे. त्यातून मीही नकळत शिकत गेले. आता इथे अमेरिकेत मी स्वतः सुद्धा अनेक cuisines चे आणि मुख्य म्हणजे healthy food चे coocking class घेते ते मम्मा, बाबाच्या प्रोत्साहनामुळेच शक्य झालं आहे. 
     पदार्थ कशा पद्धतीनी बनवावेत, त्यात काय प्रमाणात घटक पदार्थ घालावेत, त्याची पौष्टिकता कशी वाढवावी, वेगवेगळ्या वयोगटातील लोकांच्या गरजेनुसार आहारात काय असावे, तो पदार्थ कसा खावा आणि एकूणच अशा प्रकाराने पदार्थ बनवण्याची सवय आपल्या रोजच्या जीवनशैलीचा भाग कशी करावी असा सगळा विचार अनेक लोकांपर्यंत पोचावा असे नेहेमीच मम्मा, बाबाला वाटते. त्याच विचारातून मागे काही वर्षांपूर्वी मम्मानी 'आम्ही सारे खवय्ये' या 'झी मराठी' वाहिनी वरच्या कार्यक्रमात काही अत्यंत नाविन्यपूर्ण, चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ दाखवले होते. नंतर मी आणि बाबा सुद्धा परत या कार्यक्रमात गेलो आणि अजून काही पदार्थ दाखवले त्याचे video तुम्ही पहिले असतील. या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत हा विचार पोचला. अजूनही कितीतरी लोक त्याबद्दल विचारत असतात. याशिवाय मम्मा, बाबा मिळून अनेक ठिकाणी पौष्टिक आहार, संतुलित जीवनशैली, व्यायाम, stress management यासारख्या असंख्य विषयांवर गेली अनेक वर्ष भाषणं देणे, workshop घेणे यासारखे उपक्रम करत असतात. त्यातून शाळेत जाणारी वाढत्या वयाची मुले, गर्भवती बायका, जेष्ठ नागरिक, नोकरी करणारे लोक अशा वेगवेगळ्या वयाच्या लोकांच्या विशिष्ठ गरजांचा विचार करून सल्ला देतात. शिवाय ते दोघे मिळून 'मराठी खाद्यसंस्कृती' नावाचा blog लिहितात. यात अनेक पारंपारिक, नाविन्यपूर्ण, पौष्टिक, चवदार पाककृती आणि त्या बनवण्यामागचा विचार तुम्हाला वाचायला मिळेल. 
     आजपर्यंत माम्माकडून शिकलेल्या अगणित पाककृती मी माझ्या 'किचन' मध्ये नेहमीच करत आले आहे. आज Mother's Day च्या निमित्ताने या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आज मम्माच्या आवडीच्या कुठल्यातरी पदार्थाची पाककृती लिहावी असं मनात होतं पण तिच्या आवडीनिवडी काही नसल्या तरी अमुक एकच असा, तिला खूप आवडणारा पदार्थ तिला स्वतःला सुद्धा आठवणार नाही. त्यामुळे ती नेहमी करत असलेल्या आणि मीही तिच्याकडूनच शिकलेल्या माझ्या अत्यंत आवडीच्या कोथिंबीरीच्या वड्यांची पाककृती  मी आज सांगणार आहे. 




साहित्य: (साधारण 20 वड्यांसाठी)

2 कप निवडलेली कोथिंबीर, 3/4 कप हरभरा डाळीचे पीठ, 2 टीस्पून तीळ, 1/2 टीस्पून ओवा, 1/4 टीस्पून हळद, 1/4 टीस्पून तिखट, टीस्पून धन्याची पावडर, 1 टेबलस्पून तेल, टीस्पून लसूण पेस्ट, 1/2 टीस्पून आलं पेस्ट, 1/4 कप पाणी, चवीनुसार मीठ. 

(Ingradients: For 20 pieces
2 cup cilantro leaves, 3/4 cup chickpea flour, 2 teaspoon sesame seeds, 1/2 teaspoon ajwain /carom seeds, 1/4 teaspoon turmeric powder, 1/4 teaspoon chili powder, 1 teaspoon coriander powder, 1 tablespoon oil, 1 teaspoon garlic paste, 1/2 teaspoon ginger paste, 1/4 cup water, salt to taste) 



कृती: 




  • निवडलेली कोथिंबीर धुवून घ्या आणि बारीक चीरा. 
  • एका पातेल्यात पाणी तापत ठेवा. 
  • एका बाऊल मध्ये कोथिंबीर घ्या आणि त्याच्यात पाणी सोडून बाकीचे सर्व साहित्य टाका. हे सर्व कोरडे घटक नीट मिसळून घ्या. 
  • या मिश्रणात अंदाज घेत साधे पाणी मिसळा आणि त्याचा घट्ट गोळा तयार करा.
  • या गोळ्याचे दोन भाग करून त्याचे रोल करा. 
  • एखाद्या रोळीला (तळाला भोकं असलेले भांडे) थोडेसे तेल लावा आणि त्यात हे रोल ठेवा. 
  • तोपर्यंत पातेल्यातील पाणी तापले असेल. त्यावर रोळी ठेवा आणि वर झाकण ठेवा. 
  • अधून मधून रोल फिरावर रहा आणि सर्व बाजूनी एकसारखी वाफ मिळेल याची काळजी घ्या. 
  • रोल साधारण 20 मिनिटे वाफेवर शिजल्यावर बाहेर काढा आणि थंड होऊ द्या. गरम रोल कापायच्या प्रयत्नात त्याचे तुकडे पडू शकतात.










  • थंड झाल्यावर रोलच्या साधारण 1/2 सेमी च्या चकत्या कापा. फार पातळ चकत्या कापल्या तर वड्या कडक होतात. 
  • या वड्या तुम्ही deep fry किंवा shallow fry करू शकता. मी त्या शक्यतो मध्यम gas वर shallow fry करते म्हणजे कमी तेलात होतात. Gas फार मोठा ठेवलात तर वड्या करपू शकतील आणि फार बारीक gas वर केल्याने कडक होऊ शकतील.

 

(Directions:

  • Wash and finely chop cilantro leaves.
  • Boil water in a steamer.
  • Mix together all the dry ingredients with chopped cilantro leaves in a bowl.
  • Pour very little water and make a firm dough.
  • Divide the dough in 2 parts and make rolls.
  • Put them in a steamer and rotate them in regular interval to get cooked evenly from all sides.
  • Cook for approximately 20 min. Remove them from steamer and let them cool.
  • Cut the roll in to 1/2 cm slices. 
  • Deep fry or shallow fry on medium heat.)

     तर अशा या कोथिंबीरीच्या वड्या सगळ्यांनाच अतिशय आवडतात. या खुसखुशीत, चमचमीत वड्या कुठल्याही जेवणात side dish म्हणून एकदम शान आणतात आणि मुख्य जेवणाच्या आधी यांच्यावरच जास्त ताव मारला जातो. या करायलाही अतिशय सोप्या आणि पटकन होणाऱ्या आहेत. कोणी जेवायला येणार असेल तर अधीपासूनही करून ठेवता येतात. तुम्हीही करून बघा आणि कशा झाल्या ते नक्की कळवा.

Tuesday, June 4, 2013

खास 'आम' चिकन



     नुकतीच वार्षिक परीक्षा संपली आहे आणि आता चिक्कार हुंदडण्याचे दिवस! चुलत, मावस भावंडे राहायला येणार आणि मग नुसता धुडगूस. सकाळी शक्य तितकं उशिरा उठायचं. तब्येतीत खाऊन मग सगळे मित्र मैत्रिणी गोळा करून दिवसभर नुसते पत्ते, कॅरम खेळत बसायचं आणि संध्याकाळी बाहेर खेळायला जायचं ते पार रात्रीच्या जेवणाची वेळ होईपर्यंत घरी उगवायचंच नाही. रात्री उशिरापर्यंत सिनेमे बघत बसायचं आणि "झोपा आता" असं मोठ्यांचं ओरडणं कानावर पडलं तरी पांघरूणाच्या आत तोंड लपवून खुसू खुसू हसत बसायचं. सुट्टीतल्या शिबिरांना, पोहायला जायचं. गच्चीत आईस्क्रीम, भेळ पार्टी करायची. दुपारी तंगड्या भिंतीला लावून पुस्तक वाचत बसायचं… आणि "ए कुल्फीवाले" किंवा "डोंग s s रची मैना… का s s ळी मैना" असल्या आरोळ्या कानावर पडल्या की तडक उठून पळत रस्त्यावर जायचं आणि काहीतरी खात घरी परतायचं. 
     उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची एकूणच खाण्या पिण्याची एकदम चंगळ असायची. आम्ही घरीच असल्यामुळे मम्मा सतत आमच्या फरमाईशी नुसार काहीना काही खायला बनवायची. मित्र- मैत्रिणी किंवा नातेवाईक एकत्र येऊन, कुणाच्या तरी घरी आईस्क्रीमचा पॉट आणून पार्टी करणे यासारखे कार्यक्रमही अधून मधून चालायचे. उन्हाळ्याची पापड, कुरडया करण्याची कामं मम्मानी काढली की मग तर माझ्या उत्साहाला नुसता पूर यायचा. तिला या सगळ्यात मदत करणे एकीकडे चालू असले तरी मुख्य उद्देश म्हणजे पापडाच्या बोट्या, कुरडयांचा चीक खाणे. दुपारी उन्हात जाऊन अर्धवट वाळलेल्या पापड्या खाणे हाच असायचा. आम्ही पुण्याला आजीकडे गेलो की कोकम किंवा लिंबाचं सरबत, ऊसाचा रस, शहाळ प्यायचो. जांभळं, करवंद, फणसाचे गरे, अंजिर, पेरू ही सगळी फळं सुद्धा अगदी यथेच्च खायचो.  
     तुम्हाला प्रत्येकालाच थोड्याफार फरकानी तुमचं हे बालपण आठवत असेल. पण या सगळ्यात अजून एक अतिशय महत्वाची गोष्ट राहिलीच. ती म्हणजे आंबे!! आपल्याकडे एकूणच आंब्यांचा सीझन म्हणजे एक सोहोळाच असतो. मे महिन्यात भरपूर आंबे यायला लागायच्या आताच बाजारात ते क्वचित कुठे कुठे दिसू लागतात. मग सगळीकडे, "सध्या आंबे कुठे मिळताहेत आणि त्यांचा भाव काय आहे" याची जोरात चर्चा चालू होते. आणि मग काही दिवसातच बाजारात सगळीकडे आणि प्रत्येकाच्या घरी नुसते आंबेच आंबे दिसायला लागतात. त्यातसुद्धा भारतभर आंब्यांच्या दशेहरी, लंगडा, नीलम, केसर यासारख्या कितीतरी जाती मिळतात आणि त्या त्या भागात काही ठराविक जाती प्रसिध्द असतात. महाराष्ट्रात पायरी, रायवळ, तोतापूरी ह्या जाती मिळत असल्या तरी सगळी लोकं हापूससाठी अगदी वेडी असतात. 
     आम्ही लहान असताना सुट्टीत पुण्याला गेलो की सकाळी लवकर उठून गूळटेकडी market-yard ला जायचो आणि तिथे हापूस आंब्यांची पेटी आणि पायरी आंब्यांची करंडी अशी खरेदी करायचो. तिथे त्या दुकानदाराशी घासाघीस करून, आंब्यांचा भाव ठरवून, भरपूर आंबे घेऊन घरी आलो की पहिली गोष्ट म्हणजे निदान एक दोन आंबे तरी लगेचच पोटात लोटायचे. मग एखाद्या खोलीत खाली वाळलेलं गवत पसरून त्यावर पिकलेले आंबे एकीकडे, कच्चे आंबे एकीकडे अशी अढी लावायचो. आणि मग पुढचे काही दिवस सतत कुठले आंबे आधी पिकाताहेत यावर लक्ष ठेवायचो. रोज सकाळी उठलो की आंबे खाण्याचा एक मोठ्ठा कार्यक्रम व्हायचा. त्यातही प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने खायचं असायचं. कोणाला फोडी, कोणाला हापूसचा टब्बू तर कोणाला चोखून. मला नेहेमी हापूस पेक्षा पायरी जास्त आवडायचा. तो सुद्धा थोडा कच्चा, आंबट!! तो चोखून खाण्यात आणि मग साली, कोय चोखाण्यात बऱ्याचदा मला आजूबाजूच्या जगाचा विसर पडायचा. त्यातही कितीही नीट खाल्लं तरी कपड्यावर डाग पडायचेच त्यामुळे नेहेमी जुने कपडे घालून आणि खाली पेपर पसरून आंबे खायचो. मग दुपारी जेवणात कधी आमरस, कधी आम्रखंड, कधी नुसत्या दुधात आंब्यांचे तुकडे. तर कधी खास बेत ठरवून आंबा आईस्क्रीम… 
     काय मग, तुम्ही पण आंब्यांच्या स्वप्नात रंगलात ना? तुमच्याही जिभेवर आंब्याची ती मधुर चव तरळली ना? आज मला अचानक हे सगळं आठवलं याचं कारण मागच्या आठवड्यात बऱ्याच वर्षांनंतर मी पूर्ण आंबामय झाले होते. पुण्यातलं शिक्षण संपल्यावर मधली दोन वर्ष दिल्लीत आणि मग गेली तीन वर्ष अमेरिकेत असल्यामुळे अशाप्रकारे आंबा मोहोत्सव साजरा करण्याची वेळच आली नव्हती. अजूनही उन्हाळ्यात आंबे खाल्ले नाहीत तर तो उन्हाळा पूर्ण झाल्यासारखा वाटतच नाही. पण या वर्षी इथे कॅलिफोर्निया मध्ये मला हापूस आंबे मिळाले आणि त्या सगळ्या जुन्या आठवणीत (आणि आंब्यात) मी पुरती बुडाले.  
     पण या वेळचा वेगळेपणा म्हणजे नुसते आंबे खाणे आणि त्याचे पारंपारिक पदार्थ करणे याचबरोबर मी त्याच्यात काही अगदी नवीन प्रयोग करून पहिले आणि त्यातून अगदी भन्नाट आणि विश्वास बसणार नाही इतक्या अप्रतिम चवींचे पदार्थ बनवले. आपण नेहेमी आंब्याचे गोड पदार्थ खातो पण मी आंब्याची चव असलेले दोन अगदी वेगळ्या चवीचे रस्से बनवले. एक नारळाच्या दुधाची चव असलेला आणि दुसरा चायनीज स्टाईलचा. 
     अ s s हं गोंधळून जाऊ नका. खरच मला 'आंबा घातलेला तिखट रस्सा' असच म्हणायचं आहे. तुम्ही डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवा आणि खरच हे दोन्ही पदार्थ करून बघाच. (पदार्थ करताना डोळे उघडायला विसरू नका :)) माझी खात्री आहे की एकदा हे पदार्थ तुम्ही खाल्ले की प्रत्येक आंब्याचा सीझन हे पदार्थ केल्याशिवाय पूर्णच होणार नाही. तुमचा अभिप्राय मला कळवायला विसरू नका.


Coconut Mango Chicken: 


साहित्य: 
200 ग्रॅम बोनलेस चिकन, 1 आंबा, 1/2 कप नारळाचे दूध, 1/4 इंच आलं, 2 पाकळ्या लसूण, 3 -4 हिरव्या मिरच्या, 1/2 टीस्पून लिंबाचा रस, 1 टीस्पून सायीचे दही किंवा sour cream, मीठ, मिरपूड, साखर, तेल, कोथिंबीर, काजू (किंवा बदाम) 
(200 gram boneless chicken, 1 mango, 1/2 cup coconut milk, 1/4 inch ginger, 2 cloves garlic, 3-4 green chilies, 1/2 teaspoon lime juice, 1 teaspoon sour cream or curd, salt, crushed black pepper, sugar, oil, cilantro, cashew nuts.)




कृती:





  • चिकनचे तुकडे करा. त्यात आलं, लसूण पेस्ट, सायीचे दही (किंवा sour cream), लिंबाचा रस, मीठ, मिरपूड घालून 15 मिनिटे मरीनेट करा. (Cut chicken in to pieces. Add ginger, garlic paste, salt, pepper, lime juice, sour cream and marinate for 15 min.)
  • हिरव्या मिरचीचे उभे तुकडे करा. एका कढईत थोडे तेल तापवा आणि त्यात मिरचीचे तुकडे टाका. त्यात चिकन टाकून 1 मिनिट, चिकनचा रंग पांढरा होईपर्यंत शिजवा. जास्त वेळ शिजवलं तर चिकन घट्ट, कडक होतं. (Cut julians of chili and keep it aside. Heat oil in the pan. Add chili, and marinated chicken. Saute till almost cocked.)
     

  • त्यात आंब्याचा रस टाकून नीट मिसळा. त्यात नारळाचे दूध घाला. चवीनुसार मीठ, साखर आणि लिंबाचा रस घाला. ग्रेव्ही थोडी पातळ हवी असेल तर थोडे पाणी घाला आणि थोडेसे उकळा. (Add mango pulp and soute. Add coconut milk, salt and sugar. Add some water and brig it to boil.)
     

  • Gas बंद करून त्यात आंब्याचे तुकडे आणि काजू घाला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि भाताबरोबर त्याचा आस्वाद घ्या. (Remove it from stove and add mango pieces, cashew nuts and chopped coriander. Serve with steamed rice.

     आंबे, नारळ, काजू, भात हे सर्व एकाच प्रांतातले असल्यामुळे आणि अनेक पदार्थात एकत्र खात असल्यामुळे त्यांच्या चवी एकमेकांना अतिशय पूरक आहेत. या पदार्थासाठी थोडा कच्चा, आंबट आंबा वापरा. आंब्याची आंबट गोड चव नारळाच्या दुधाबरोबर खूप मस्त लागते. मधूनच हिरव्या मिरचीचा तिखटपणा आणि स्वाद यांनी मजा येते. मुलायम ग्रेव्ही, त्यातले लुसलुशीत शिजलेले चिकन याबरोबर मधेच दाताखाली येणारे काजू एकदम रंगत आणतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंब्याचा तो अद्वितीय स्वाद या पदार्थाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. यात चिकन ऐवजी पनीर सुद्धा तितकेच चांगले लागते. 









Mango Chili Chicken:


साहित्य:
200 ग्रॅम बोनलेस चिकन, 1 आंबा, 1/4 इंच आल्याचे बारीक तुकडे, 2 पाकळ्या लसणाचे बारीक तुकडे, 3 -4 सुक्या लाल मिरच्या, 1 1/2 टीस्पून भाजलेले तीळ, 1/2 टीस्पून लिंबाचा रस, 1 अंड, 1/2 कप उभा चिरलेला कांदा, 4 -5 ढब्बू मिरचीच्या चकत्या, 1/2 टीस्पून सोया सॉस, 1 1/2 टेबलस्पून कॉर्न स्टार्च, मीठ, मिरपूड, साखर, तेल, कोथिंबीर. 
200 gram boneless chicken, 1 mango, 1/4 inch ginger finely chopped, 2 cloves garlic finely chopped, 3-4 dry red chilies, 1 1/2 teaspoon roasted sesame seeds, 1/2 teaspoon lime juice, 1 egg, 1/2 cup onion cut in strips, 4-5 slices of capsicum (green pepper), 1/2 teaspoon soya sauce, 1 1/2 tablespoon corn starch, salt, crushed black peper, sugar, oil, cilantro. 

कृती:
  • चिकनचे तुकडे करा. त्यात अंड, मीठ, मिरपूड, सोया सॉस, 1 टेबलस्पून कॉर्न स्टार्च घालून 15 मिनिटे मरीनेट करा. एका कढईत तेल तापवून त्यात चिकनचे तुकडे तळा आणि बाजूला ठेवून द्या. (Cut chicken in to pieces. (Add egg, salt, pepper, soya sauce, 1 tablespoon corn starch and marinate for 15 min. Heat oil in a pan and deep fry chicken pieces. Keep it aside.)
     

  • एका कढईत थोडे तेल तापवा आणि त्यात सुक्या लाल मिरच्या, तीळ टाका. (Heat oil in a pan and add dry red chilies, sesame seeds.) 
     

  • त्यात आलं लसणाचे तुकडे टाका. कांदा, ढब्बू मिरचीच्या चकत्या घालून परता. (Add chopped ginger, garlic. Add onion and sliced green pepper and sauté.) 
     

  • त्यात आंब्याचा रस टाकून नीट मिसळा. कॉर्न स्टार्च थोड्याशा पाण्यात कालवून ते मिश्रण घाला. एकीकडे सतत ढवळत रहा. त्यात चवीनुसार मीठ, साखर आणि लिंबाचा रस घाला. ग्रेव्ही थोडी पातळ हवी असेल तर थोडे पाणी घाला. तळलेले चिकन ग्रेव्ही मध्ये मिसळा. (Add mango pulp and mix it well. Add little water in corn starch to make paste and add it to gravy. Stir constantly. Add salt, sugar and lime juice. Add water for thiner gravy. Add fried chicken in gravy.)
     

  • Gas बंद करून त्यात आंब्याचे तुकडे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, तीळ घाला आणि भाताबरोबर त्याचा आस्वाद घ्या. (Remove it from stove and add mango pieces, chopped coriander and sesame seeds. Serve with steamed rice.)

     या पदार्थामध्ये चिकनचे तुकडे हे अंड आणि कॉर्न स्टार्च मध्ये बुडवून तळल्यामुळे त्याला बाहेरून एक आवरण येतं आणि त्याला लागलेला आंब्याचा सॉस त्याची लज्जत वाढवतो. चिकन ऐवजी पनीर किंवा बेबी कॉर्न सुद्धा यात खूपच मस्त लागतात. ते तळण्यासाठी वरीलप्रमाणे मिश्रण बनवा फक्त त्यात अंड्याऐवजी पाणी घाला. या पदार्थासाठी सुद्धा थोडा आंबट आंबा घ्या म्हणजे त्याची आंबट गोड चव या चायनीज स्टाईलला पूरक होईल. यात मधेच दाताखाली येणारे तीळ, आंब्याचे तुकडे एकदम बहार आणतात. आणि सुक्या मिरच्यांच्या स्वदाबद्दल तर काय बोलावे!! यात आंबा, ढब्बू मिरची, सुक्या लाल मिरच्या, कोथिंबीर आणि तीळ या सर्वांच्या विविध नैसर्गिक रंगांची अतिशय सुंदर रंगसंगती दिसते. आणि नुसता पदार्थ बघूनच तोंडाला पाणी सुटते. 

     आंब्याचा असाच अजून एक चविष्ट पदार्थ  'आंबा भेंडी' हा पण जरूर करून बघा. त्याची पाककृती तुम्हाला माझ्या बाबाच्या ब्लॉग वर इंग्लिश आणि मराठीत मिळेल. चला तर मग लगेच तयारीला लागा. आणि आंब्याचा सीझन संपण्याच्या आत याचा आस्वाद घ्या.