Thursday, June 21, 2012

Wedding Anniversary Special :)

     "मी मालविका." मी अगदी नेहमीसारखीच बोलले पण त्याला जरा शिष्ठ वाटले, पण तरीही आवडले. "आपण आधी practical बोलू." असं बोलून त्यानी बोलायला सुरुवात केली. मी अजूनही तशीच 'मालविका' आहे आणि त्याला आवडते आणि तो अजूनही practical बोलतो. अशी आमची तेव्हा पहिली ओळख झाली आणि आता आमच्या लग्नाला नुकतीच तीन वर्ष झालीही. कधी वाटतं याला तर कितीतरी वर्ष ओळखतीये आणि कधी अजूनही त्याच्याबद्दल एखादी नवीन गोष्ट कळते. पण एक गोष्ट तेव्हाही तीच होती आणि अजूनही टिकून आहे किंवा खरं तर वाढली आहे ती म्हणजे आमच्यातली Chemistry.
     माझा नवरा कसा असेल याबद्दल माझ्या काही कल्पना होत्या आणि मी माझ्या स्वभावानुसार त्याबद्दल analysis करून काही criteria ठरवले होते. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे, "तो वेडा असला पाहिजे." कुठल्यातरी गोष्टीचे वेड, passion यांनी झपाटून जाणारा असला पाहिजे. आणि ती गोष्ट तेजस मध्ये अगदी पुरेपूर आहे. तो music साठी खरच वेडा आहे. तो अनेक प्रकारची वाद्ये वाजवतो, music compose, record करतो. आणि या व्यतिरिक्त एकूणच फिरणे, लिहिणे आणि सतत jokes मारणे यात त्याला खूपच रस आहे. यातलीच त्याची एक अत्यंत आवडीची गोष्ट म्हणजे पदार्थ बनवणे. 
     आम्ही दोघेही अतिशय भिन्न प्रवृत्तीची माणसे आहोत. आम्हाला दोघांनाही कुठल्या न कुठल्या गोष्टीची passion आहे हे साधर्म्य सोडले तर आमचे आवडीचे विषयही अतिशय वेगळे आहेत. याला फक्त एक  अपवाद आहे आणि तो म्हणजे पदार्थ बनवणे. त्या एकाच गोष्टीत आम्ही खऱ्या अर्थाने एकत्र काम करू शकतो, आणि आश्चर्यकारकरित्या, मतभेद न  होता, आमचं त्यात उत्तम पटतं. लग्न झालेल्या सर्वांना ही गोष्ट किती दुर्मिळ आहे याची जाणीव असेल. एखाद्या संध्याकाळी किंवा कोणी येणार असेल तर मेन्यू काय करायचा हे ठरवणे, पदार्थाचा अंदाज घेणे आणि प्रत्यक्ष पदार्थ बनवणे हे आम्ही एकत्र करतो. शिवाय गंमत  म्हणजे एक पदार्थ तो बनवणार आणि एक मी या पद्धतीनी काम होत नाही तर आम्ही दोघेही एकत्रच पदार्थ बनवत असतो. आणि तरीही मीठ दोनदा पडलं किंवा अजिबात पडलंच नाही असं जवळपास कधीच  होत नाही. खरतर हे असं coordination आम्हाला सहजच जमलय. पण त्यामुळे पदार्थ बनवायला खूपच मजा येते आणि तेच सर्वात महत्वाचं !!
     आपल्या जवळच्या माणसांना आपल्याला त्यांच्याबद्दल काय वाटतं हे प्रत्यक्ष सांगण्याची फारशी कधी वेळ येत नाही. म्हणून आमच्या wedding anniversary च्या निमित्तानी मी तेजस बद्दल लिहितीये. मी blog लिहावा ही मुळात त्याचीच कल्पना आहे. मी आज तुम्हाला आमच्या Wedding Anniversary Special जेवणाबद्दल सांगणार आहे. अर्थातच हे जेवण आम्ही दोघांनी एकत्र बनवलं हे वेगळं सांगायला नकोच आणि तेच आमचं celebration होतं... !!!


भात:


साहित्य: 1 कप तांदूळ, 1 1/2  टी स्पून लोणी, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक केलेले मिरे,थोडेसे तेल, 2 कप पाणी, मीठ चवीनुसार.
(1 cup rice, 1 1/2 teaspoons butter, finely chopped cilantro / coriander leaves, crushed black pepper, oil, 2 cups of water, salt to taste.)



कृती:
  • पाणी तापत ठेवा. (Bring water to boil.)
  • कढईत थोडेसे तेल टाकून त्यात लोणी टाका म्हणजे लोणी जाळणार नाही. (Heat little oil in pan and add butter. This way butter will not burn.)
  • त्यात धुतलेले तांदूळ टाकून हलके होईपर्यंत परता. नंतर त्यात उकळलेले पाणी टाका. (Add washed rice and sauté for 2 minutes. Add hot water.)
  • मीठ, बारीक केलेले मिरे, थोडीशी कोथिंबीर घालून नीट हलवून घ्या आणि झाकण ठेवून शिजू द्या. अशा प्रकारे केलेला भात एकदम मोकळा होतो. (Add crushed pepper, finely chopped cilantro / coriander leaves, salt and mix it well. Cover with lid and cook till rice is done.)
  • भात शिजल्यावर वरून थोडी कोथिंबीर टाका. (Garnish with finely chopped cilantro / coriander leaves.)
या भाताला लोणी आणि कोथिंबीर याचा मस्त स्वाद येतो आणि तो जेवणातल्या बाकीच्या चवींबरोबर छान लागतो.


तंदूर चिकन:


साहित्य: 200 gram चिकन, 2 टेबल स्पून दह्याचा चक्का, 2 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, 2 टी स्पून तंदूर चिकन मसाला, अर्धा टी स्पून काश्मिरी लाल तिखट, पाव चमचा लिंबाचा रस, अर्धा टी स्पून तेल, चवीनुसार मीठ.
(200 gram chicken, 2 tablespoons hung curd, 2 garlic cloves, 1/2 inch ginger, 2 green chillies, 2 teaspoons Tandoor chicken masala, 1/2 teaspoon Kashmiri red chilli powder, 1/4 teaspoon lemon juice, 1/2 teaspoon oil, salt to taste.)
कृती:
  • आलं, लसूण, हिरव्या मिरच्या बारीक वाटून घ्या आणि चिकन मध्ये घाला. (Make a fine paste of ginger, garlic, green chillies and apply that onchicken.)
  • चिकनमधे तंदूर चिकन मसाला, काश्मिरी लाल तिखट, दह्याचा चक्का, लिंबाचा रस, तेल, मीठ घाला आणि नीट चोळून घ्या. हे मिश्रण अर्धा तास marinate करा. (Add Tandoor chicken masala, Kashmiri red chilli powder, hung curd, lemon juice, oil, salt and mix it well. Marinate for half hour.)
  • ओव्हन 5 मिनिटे 200 deg C (400deg F) ला preheat करा. नंतर चिकन ओव्हन मध्ये ठेवून 175deg C (350deg F) ला 15-20 मिनिटे भाजून घ्या. भाजताना हवे असल्यास थोडे लोणी वरून लावा. (Preheat oven at  200 deg C i.e. 400deg F for 5 minutes. Roast chicken at 175deg C i.e. 350deg F for 15-20 minutes. Baste it with butter if needed.)
  • खाताना त्यावर लिंबाचा रस आणि चाट मसाला टाकून खा. (Sprinkle Chaat masala and lemon juice.)



Stuffed Mushroom:

साहित्य: 8-10 मशरूम, 1/2 कप मटारचे दाणे, 1/8 कप पनीर, लिंबाचा रस, तिखट, चीज, ओरेगानो, मीठ चवीनुसार.
(8-10 mushrooms, 1/2 cup green peas, 1/8 cup Paneer, lemon juice, red chilli powder, cheese, oregano, salt to taste.)
कृती: 
  • मशरूमचे देठ काढून आत पोकळी तयार करून घ्या. (Separate stems from mushrooms.)
  • मशरूमला मीठ, लिंबाचा रस, ओरेगानो चोळून 10 मिनिटे ठेवा. (Marinate mushrooms with salt, lemon juice, oregano for 10 minutes.)
  • मटारचे दाणे वाफवून, कुसकरून घ्या. त्यात किसलेले पनीर, तिखट, लिंबाचा रस, मीठ घाला आणि नीट मिसळून घ्या. (Steam and crush green peas. Add grated Paneer, red chilli powder, lemon juice, salt and mix it well.)
  • हे मिश्रण मशरूमच्या पोकळीत भरा. त्यावर किसलेले चीज टाका. (Stuff mushrooms with the mixture. Add grated cheese on top.)
  • ओव्हन 5 मिनिटे 200deg C (400deg F) ला preheat करा. नंतर मशरूम ओव्हन मध्ये ठेवून 175deg C (350deg F) ला 15 मिनिटे भाजून घ्या. (Preheat oven at  200 deg C i.e. 400deg F for 5 minutes. Roast mushrooms at 175deg C i.e. 350deg F for 15 minutes.)



Asparagus:

साहित्य: 1 Asparagus ची जुडी, olive oil, बारीक केलेले मिरे, मीठ चवीनुसार.
(1 bundle of asparagus, olive oil, crushed black pepper, salt to taste.)
कृती:
  • Asparagus ची खालची जाड टोके कापून टाका. (Trim the ends of asparagus.)
  • एका बेकिंग ट्रे वर Asparagus पसरा. त्यावर olive oil, मीठ, बारीक केलेले मिरे टाका आणि नीट चोळून घ्या. (Put asparagus on a backing tray. Drizzle olive oil, sprinkle crushed black pepper, salt and rub it well.)
  • ओव्हन 5 मिनिटे 200deg C (400deg F) ला preheat करा. नंतर Asparagus ओव्हन मध्ये ठेवून 175deg C (350deg F) ला 10 मिनिटे भाजून घ्या. (Preheat oven at  200 deg C i.e. 400deg F for 5 minutes. Roast asparagus at 175deg C i.e. 350deg F for 10 minutes.)

     तंदूर चिकन, stuffed mashrooms आणि asparagus चा खरपूस भाजल्याचा वास ओव्हन मधून यायला लागल्यावर तुमची भूक अजूनच खवळेल. या सगळ्या वेगवेगळ्या चवी एकमेकांबरोबर खूपच मस्त लागतात. शिवाय यासोबत तुम्ही मक्याचे भाजलेले कणीस, सलाड किंवा एखादे सूप असे खाऊ शकता. अशा जेवणातला सगळ्यात गंमतीचा भाग म्हणजे हे जेवण सगळे एकत्र बनवू शकतात आणि त्यामुळे प्रत्येकजण स्वतःच्या कौशल्याने एकेका पदार्थाची रंगत वाढवू शकतो. तुम्हीही हे घरी एकत्र करून बघा आणि त्याचा एकत्र बसून, गप्पा मारत आस्वाद घ्या. 


Wednesday, October 19, 2011

Croissant Chicken Sandwich

     मला अगदी सुरवातीलाच हे सांगायला आवडेल की हा पदार्थ मी माझ्या दादाकडून शिकले आहे. असं आधीच सांगण्याचे दोन उद्देश आहेत. एक म्हणजे दादा हे sandwich इतकं मस्त बनवतो की त्याचे credit त्याला जरूर द्यायलाच पाहिजे. आणि दुसरं कारण म्हणजे नाहीतर मला पुढे कित्येक महिने, "तू माझी recipe  ढापलीस." असं त्याच्याकडून खूप चिडवून घ्यावं लागलं असतं. ज्यांना मोठा भाऊ असेल त्या सगळ्यांना हे चिडवणं कसं असतं हे नक्कीच कळेल.
     लहान असल्यापासून दादा करतो ते सगळच नेहमी बरोबर असतं अशी माझी एक समजूत झाली होती. त्यामुळे कुठल्याही गोष्टीत त्याच्यावर प्रचंड विश्वास. आम्ही चिक्कार भांडायचो पण जेव्हा कधी काही कारणानी मम्मा, बाबा बाहेर गेलेत आणि आम्ही दोघेच घरी आहोत अशी परिस्थिती निर्माण व्हायची तेव्हा तो एकदम जबाबदारीने माझी काळजी घ्यायचा आणि मी पण तो म्हणेल ते निमूट ऐकायचे. 
     एकदा एका संध्याकाळी मम्मा रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. पालेभाजी करायची म्हणून लसूण सोललेला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळची शाळा म्हणून ब्रेड आणलेला होता. आणि अचानक बाबाकडे delivery ची case आली आणि बाबा, मम्मा लगेच हॉस्पिटल मध्ये गेले. आमचं जेवण झालं नव्हतं. मग दादानी त्याचं सुपीक डोकं चालवलं आणि सोललेल्या लसणाची चटणी केली. बरं, तोही तसा लहान होता त्यामुळे त्याला मिक्सर चालवता येत नव्हता म्हणून त्यानी हातोडी काढली. ती स्वच्छ धुऊन घेतली आणि त्यानी लसूण कुटला. मग आम्ही ब्रेड बरोबर लसूण चटणी असं मस्त जेवण केलं. घरी आल्यावर मम्माला त्याचा हा पराक्रम कळल्यावर, "at least हा कधी उपाशी राहणार नाही." हे बघून हुश्श झालं.
     नंतर एकदा मी आठवीत असताना माझी चित्रकलेची elementary परीक्षा होती. आणि त्याच वेळी माझे आजोबा आजारी असल्यामुळे आम्ही सगळे पुण्याला होतो. माझी परीक्षा बुडू नये म्हणून मी आणि दादा दोघेच वाईला आलो. आणि परीक्षा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी परत लगेच पुण्याला गेलो. पण तेवढे दोन दिवस दादानी माझी पूर्ण काळजी घेतली. एरवी इतके भांडणारे आम्ही, अशी वेळ आली की इतक्या प्रेमाने वागायचो. ते दोन्हीही दिवस दादा मला मस्त डबा तयार करून देत होता. आणि ते सगळे पदार्थ त्याच्या डोक्यातूनच आलेले असावेत कारण मम्मा तसे कधी करायची नाही. 
     तर आज त्याची recipe लिहिण्याच्या निमित्ताने मला त्यानी आजपर्यंत अनेकदा करून खायला घातलेले पदार्थ आठवले. मी अमेरिकेत आल्यावर पहिले चार महिने दादाची family, मी आणि तेजस असे आम्ही सगळे एकत्र राहत होतो. आणि नंतरही जवळपास एक वर्ष काही तासांच्या अंतरावर राहत होतो. त्यामुळे आम्ही सगळे अधूनमधून भेटायचो. आणि भेटल्यावर काय काय खायचे याचेच plans जोरदार असायचे. त्यावेळी प्रत्येकजण आपापली specialty dish करायचा. गम्मत म्हणजे दादानी केलेले पदार्थ एकदम सोप्पे वाटायचे आणि आम्ही परत घरी आल्यावर ते करून बघायचो पण ते कधीच त्यानी केलेल्या पदार्थासारखे व्हायचे नाहीत. कुठेतरी प्रमाणात कमी जास्त होत असेल किंवा 'एखाद्याच्या हाताची चव' म्हणतात तसा प्रकार असेल. पण दादाचे tomato rice, chicken steamboat असे काही खास पदार्थ त्यानी केलेलेच मस्त लागतात. 
     तर असाच खास त्याचा हा पदार्थ Croissant Chicken Sandwich. हा आम्ही अनेकदा केला आणि तो बराचसा दादासारखा जमलाय. म्हणून तुम्हालाही ही recipe सांगते. घरी नक्की करून बघा आणि कसा झाला ते जरूर कळवा.

साहित्य: 2 Sandwiches साठी
200 ग्रॅम बोनलेस चिकन, 1 वाटी मोठे तुकडे केलेली 2 रंगांची ढब्बू मिरची, 1 वाटी मोठे तुकडे केलेला कांदा, 1-2  बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 टेबल स्पून बारीक चिरलेला लसूण, पाव टी स्पून तंदूर चिकन मसाला, अर्धा टी स्पून लिंबाचा रस, 2 टी स्पून लोणी, 1-2 टी स्पून tomato चिली सॉस (जर tomato ketchup असेल तर शिवाय अर्धा  टी स्पून साखर), किसलेले चीज, 2 Croissants (हे नसल्यास पाव भाजी चा ब्रेड किंवा ब्रेडचे स्लाईस), चवीनुसार मीठ.


कृती:
  • चिकनचे छोटे तुकडे करून त्यात तंदूर चिकन मसाला, लिंबाचा रस आणि मीठ घालून 15  मिनिटे marinate करा. 
  • कढईत अगदी थोडे तेल घ्या आणि त्यात 1 टी स्पून लोणी घाला. (असे केल्याने लोणी जळत नाही.)
  • लोणी वितळले की त्यात बारीक चिरलेला लसूण घालून परता. लसणाचा रंग थोडा brown झाला की बारीक चिरलेली मिरची घाला.
  • त्यात कांदा घालून थोडासा परतून घ्या आणि मग ढब्बू मिरची आणि मीठ घाला. कांदा आणि ढब्बू मिरची अगदी थोडी शिजवा. 
  • त्यात  tomato चिली सॉस घाला. नीट मिक्स करा आणि बाजूला काढून ठेवा. 
  • कढईत परत किंचित तेल घेऊन त्यात उरलेले 1 टी स्पून लोणी घाला. लोणी वितळले की त्यात चिकन घाला आणि शिजेपर्यंत चांगले परतून घ्या. चिकनला थोडे पाणी सुटेल. यात शिजण्यासाठी वेगळे पाणी घालू नका. 
  • चिकन शिजले की त्यात मगाशी बनवलेली कांदा आणि ढब्बू मिरचीची भाजी घालून नीट मिक्स करा. 
  • Croissant मधून अर्धा कापा आणि त्यात हे सारण भरा. वरून किसलेले चीज टाका आणि Croissant बंद करून microwave oven मध्ये 30 सेकंद गरम करा. यामुळे आतले चीज वितळेल आणि Croissant गरम  होईल.

     आता या मस्त गरमा गरम Croissant Chicken Sandwich चा भरभरून आस्वाद घ्या. यात चिकन ऐवजी पनीर चे तुकडेही घालू शकता. त्यात पनीरही marinate करून लोण्यावर परतून घ्या. ह्या Sandwich ला अगदी कमी साहित्य लागते आणि अगदी पटकन बनते. शिवाय 2 रंगांच्या ढब्बू मिरचीमुळे दिसायला एकदम आकर्षक दिसते. तर असे हे झटपट बनणारे आणि जिभेचे सगळे चोचले पुरवणारे Croissant Chicken Sandwich नक्की करून बघा. 













Sunday, August 7, 2011

शेतातली सहल

     सध्या इथे अमेरिकेत उन्हाळा चालू आहे. त्यामुळे हिंडणे, फिरणे, ट्रीपला जाणे अशा घराबाहेरच्या activities खूप चालू आहेत. आम्ही जिथे राहतो तिथे हिवाळ्यात बर्फ पडत असल्यामुळे तेव्हाचा जास्तीत जास्त काळ घरातच काढावा लागतो. त्यामुळे उन्हाळ्याची सगळेजण खूप आतुरतेने वाट बघत असतात आणि तेव्हा बाहेर फिरायची एकही संधी सोडत नाहीत.   
कच्च्या Black berries
     असच मागच्या आठवड्यात आम्ही एका शेतात गेलो होतो. आपण भारतात कसं शेतात हुरडा खायला, मक्याची कणसे, हरभरे, ऊस खायला जातो चक्क तसच आम्ही अमेरिकेत गेलो होतो. त्या शेतात आत्ता काय पिकले आहे याची सगळी माहिती तुम्हाला घरी internet वर मिळते आणि तुम्ही त्या site वर register केलं की अधून मधून आता शेतात सध्या काय तयार झालय याच्या तुम्हाला email येत राहतात.
      इथे खूप मोठी मोठी शेतं असतात. त्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या भाज्या, फळं लावलेली असतात. आणि त्याच्या direction साठी सगळीकडे पाट्याही लावलेल्या असतात. थोड्या थोड्या अंतरावर एक तात्पुरता आडोसा केलेला असतो आणि तिथे एक माणूस उभा असतो. तो आपल्याला पिकांच्या कुठल्या ओळीत जा म्हणजे तयार फळं किंवा भाज्या मिळतील ते सांगतो. शिवाय तिथे फळं गोळा करण्यासाठी पिशव्या, बॉक्सेस याची सोय केलेली असते आणि एक वजनाचा काटाही असतो. तुम्ही स्वतः शेतात जाऊन झाडावरची तयार फळं गोळा करायची आणि पिशवीत भरून आणायची. तोडता तोडता तिथेही थोडीफार फळं खाऊ शकता आणि उरलेली फळं विकत घ्यायची.     
     
Blue berries
     तर आम्ही आधी गेलो ते Blueberry च्या शेतात. इथे अमेरिकेत खूप प्रकारच्या berries मिळतात. त्यापैकी ब्लूबेरी करवंदासारख्या दिसतात आणि चवीला खूप मस्त लागतात. नेहेमी बाजारात पिकलेल्या ब्लूबेरी मिळतात. तिथे मी सहज एक कच्ची ब्लूबेरी खाऊन बघितली तर ती इतकी मस्त आंबट गोड, थोडीशी राय आवळ्यासारखी लागली. मग थोड्याशा तशा कच्च्याच तोडून आणल्या आहेत. त्याचे ताजे लोणचे मस्त होईल.
    


     
Grape tomato
     नंतर आम्ही कांदे आणि tomato च्या शेतात गेलो. कांदे जमिनीच्या आत लागतात असं फक्त माहित होतं पण कधी स्वतः ते उपटण्याची वेळ आली नव्हती त्यामुळे मजा आली. tomato अजून कच्चे होते त्यामुळे ते थोडेसेच कच्च्या tomato च्या भाजी किंवा चटणीसाठी आणले आहेत. इथे cherry tomato आणि grape tomato असे दोन अगदी छोटे द्रक्षासारखे दिसणारे tomato चे प्रकार मिळतात. तसे तिथे लागले होते. त्यातला सहज एक खाऊन बघितला तर तो इतका चवदार असेल याची आधी कल्पनाच आली नव्हती. वरून मस्त तयार पण करकरीत, अजिबात मऊ पडलेला नाही, आणि दाताखाली चावला की आतून मस्त रस यायचा. नुसता tomato इतका छान लागू शकतो असं कोणी सांगितलं असतं तरी खरं वाटलं नसतं. आम्ही तर ते नुसते फळं खावीत तसे खाल्ले. 
     
वांगी 
     मग आम्ही Black berry, Raspberry, वांगी, सफरचंद पहिली. पण ते सगळं अजून तयार व्हायचं होतं. शिवाय हिरव्या, काळ्या आणि लाल कच्च्या द्राक्षाचे मांडव पण पहिले. ते तर इतके सुंदर दिसत होते. द्राक्षाचे नाजूक घड आणि त्याची मस्त आकाराची पानं हे एखाद्या चित्रासारखं दिसत होतं. म्हणजे जीभ जरी नाही तरी डोळे पुरते तृप्त झाले. बाकी कोल्ह्याच्या गोष्टीसारखी द्राक्षे आंबटच असणार !!
     




Plums
     नंतर आम्ही Plum आणि Nectarine च्या बागेत गेलो. प्लम म्हणजे भारतात ज्याला आलुबुखार म्हणतात ते फळ. आणि Nectarine हे Peach च्या जातीतले एक फळ आहे. ह्या दोन्ही फळांना मस्त आंबट गोड चव आणि दोन्हीला अगदी वेगवेगळा पण खूप सुंदर स्वाद असतो. ती पण अगदी पोटभर खाल्ली. तोपर्यंत पोट अगदी तुडुंब भरलं होतं. पण फळांमुळे भरलेलं असल्यामुळे अजिबात जड झालं नव्हतं. आणि अशाप्रकारे बागेत जाऊन पोटभर फळं खाण्याची एक गम्मत असते. तिथे तुम्हाला वाटतं की आता जेवण रद्द !! पण फळं Appetizer म्हणून वागतात आणि शेतातून घरी जाईपर्यंत तुम्हाला परत भूक लागते. 
     अशा प्रकारे शेतात झाडावरून तोडून लगेच खाल्लेल्या या फळांना काहीतरी विलक्षण चव लागते. बाजारातून कितीही ताजी म्हणून आणलेल्या फळांना तशी चव कधी लागूच शकत नाही. तुम्हीही एकदा असं शेतात जाऊन खायचा आस्वाद घ्या म्हणजे मी काय म्हणतीये त्याचा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव येईल. 
     शिवाय  लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्या माणसांसाठी सुद्धा ही एक चवदार आणि शैक्षणिक अशी ट्रीप होईल. कारण कित्येकवेळा आपण झाडं, फळं, भाज्या याबद्दल शाळेत शिकलेलो असतो पण एकतर त्यातल्या अर्ध्या गोष्टी विसरलेल्या असतात आणि अशाप्रकारे प्रत्यक्ष तर कधी बघितलेल्याच नसतात. त्यामुळे सुमधुर चव, ताजेपणा, रसरशीतपणा याबरोबरच जाताजाता नकळत शिक्षण मिळालं तर काय हरकत आहे !! काय मग तुम्ही कधी जाताय शेतातल्या सहलीला? 





Friday, July 1, 2011

बटर चिकन

     कुठल्याही पद्धतीने बनवलेलं चिकन हा मला वाटतंय माझा all time favorite पदार्थ आहे. जेवणात चिकन असलं की बहुतेक माझं मांजरात रुपांतर होत असावं. मांजरासाराखीच मी अगदी मन लावून खाते, ताटच काय तर चिकन शिजवलेलं भांडही चाटून पुसून स्वच्छ करते, खुशीनी बहुदा नसलेली शेपूटही हलत असावी आणि जेवण झाल्यावर तसाच एक तृप्त भाव माझ्या चेहेऱ्यावरही झळकत असावा.
     लहानपणी मी नेहमीचं जेवण कसबसं खायचे आणि जेवताना, "अगं पटपट जेव. जेवणाकडे जरा लक्ष दे. केवढसं खातेस." हे संवाद ऐकावे लागायचे. तेव्हा महिन्यातून एखाद्यावेळी चिकनचा बेत ठरलेला असायचा. आधीपासूनच या वेळी कशा प्रकारे बनवायचं ही ठरावा ठरावी व्हायची आणि चिकन बनवलं जायचं. त्यावेळचं जेवण मात्र कोणीही न सांगता अगदी व्यवस्थित व्हायचं. 
     त्यावेळी वाईला हॉटेल नसल्यामुळे जे काही नवीन खायचं ते घरीच बनवलं जायचं. खूप नवीन रेसिपी करून बघायचो, वेगवेगळे प्रयोग करायचो. नंतर पुण्याला एकदा हॉटेल मध्ये बटर चिकन खाल्लं आणि त्या पदार्थाच्या मी प्रेमात पडले. त्यानंतरही हॉटेल मध्ये खायचं असेल तर एक बटर चिकन मागवायलाच पाहिजे असा अलिखित नियम झाला. मला वाटतं चिकन खाणाऱ्या सगळ्यांचीच हॉटेल मध्ये गेल्यावर बटर चिकन ही पहिली निवड असते. त्याची ती आंबट आणि गोडसर चव, अगदी योग्य प्रमाणात पडलेल्या मसाल्यांचा स्वाद, मस्त शिजलेलं आणि वेगळाच सुंदर स्वाद असलेला चिकन आणि ग्रेव्ही मधला तो creaminess याचा मोह सगळ्यांनाच पडतो. 
     ते चिकन इतकं आवडलं होतं की तसं घरी करण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला गेला. दर वेळी चिकन मस्त व्हायचं पण ती जी चव डोक्यात होती नेमक्या तशा चवीचं मात्र कधी जमलं नाही. तेव्हा विचार केला की याची काहीतरी अवघड रेसिपी असणार तेव्हा हा पदार्थ बहुतेक नेहमी हॉटेल मधेच खावा लागणार. अगदी अचानक एकदा संजीव कपूरची बटर चिकनची रेसिपी बघण्यात आली. म्हणलं करून तर बघूया..... आणि काय आश्चर्य ते बटर चिकन अगदी जसं पूर्वी खाल्लं होतं तसच बनलं. आणि सर्वात गम्मत म्हणजे त्याची रेसिपी अतिशय सोपी होती. ती करताना 2-3 अशा क्रिया केल्या होत्या की ज्या आधी अजिबात माहित नव्हत्या आणि त्यामुळेच त्याला त्याची अशी ती स्पेशल चव येत होती. त्यामुळे आता घरी बनवलेलं बटर चिकन हे हॉटेल पेक्षाही छान बनतं अशा निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत.
     तुम्हीही या रेसिपीनी बटर चिकन घरी करून बघा. मला खात्री आहे की तुम्हीही स्वतःला 'हॉटेलपेक्षाही छान बनवणारा / बनवणारी ' असं certificate देऊन टाकाल.

साहित्य:
500 ग्रॅम बोनलेस  चिकन, पाऊण वाटी दही, 1 इंच आलं, 2 पाकळ्या लसूण, 2 टी स्पून लिंबाचा रस, 1/2 टी  स्पून गरम मसाला पावडर, 1/2 टी स्पून काश्मिरी लाल तिखट (हे कमी तिखट आणि रंगाने खूप लाल असते. हे नसेल तर साधे लाल तिखट कमी प्रमाणात घाला.), 1 टेबल स्पून तेल (मोहरीचे असल्यास चांगला स्वाद येतो.), मीठ. 
ग्रेव्ही साठी: 2-3 tomato, 2  टी स्पून लोणी, 2 टी स्पून आलं लसूण पेस्ट, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1/4 टी स्पून कसुरी मेथी, 1/4 टी स्पून गरम मसाला पावडर , 1 टी स्पून अख्खा गरम मसाला (लवंग, वेलदोडे, दालचिनी, काळी मिरी), 1 टेबलस्पून मध किंवा साखर, 1 वाटी क्रीम, मीठ.

कृती:
  • चिकनचे छोटे तुकडे करून घ्या. त्यात तिखट, मीठ आणि लिंबाचा रस टाका आणि नीट चोळून घ्या. हे चिकन अर्धा तास ठेवून द्या.
  • एखाद्या पातळ कापडात दही बांधा आणि 20 मिनिटे टांगून ठेवा. यामुळे दह्यातील पाणी गळून जाईल आणि घट्ट चक्का तयार होईल. 
  • चक्क्यात तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला पावडर, तेल घाला आणि मिसळून घ्या. हे मिश्रण चिकनला नीट लावून घ्या आणि चिकन 3-4 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. (फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे चिकनला पाणी सुटत नाही.)
  • tomato गरम पाण्यात 5 मिनिटे उकळा आणि ते थंड झाले की मिक्सर मधून काढून त्याची प्युरी बनवा. 
  • ओव्हन 10 मिनिटे 200deg C (400deg F) ला preheat करा. चिकन ओव्हनच्या लाकडी किंवा लोखंडी सळयांना लावा. (लाकडी सळया वापरणार असाल तर त्या आधी अर्धा तास पाण्यात भिजवून घ्या नाहीतर त्या ओव्हन मध्ये जळू शकतात.) चिकन 12 -15 मिनिटे बेक करा. चिकन शिजत आले की त्यावर लोणी लावा आणि परत 2 मिनिटे बेक करा. त्यानंतर ओव्हनमधून काढून ठेवा नाहीतर ते खूप कोरडे होते.
  • एका कढईत किंचित तेल घ्या आणि त्यावर लोणी टाका. (तेलात लोणी टाकल्याने लोणी जळत नाही.) त्यात अख्खा गरम मसाला टाका. मग त्यात आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून किंचित परता. त्यात tomato प्युरी, गरम मसाला पावडर, मीठ, हवे असल्यास तिखट, पाऊण कप पाणी घाला आणि चांगले उकळा. gas बारीक करून अजून 5 मिनिटे उकळा. (हॉटेलमध्ये या ग्रेव्हीत लाल रंग घालतात. पण असा कृत्रिम रंग खाणे फारसे चांगले नाही. शिवाय पिकलेले tomato आणि काश्मिरी लाल तिखट वापरले असेल तर ग्रेव्हीला मुळात चांगला लाल रंग येतो.)
  • कसुरी मेथी तव्यावर किंचित गरम करून घ्या आणि त्याचा हाताने चुरा करून ग्रेव्ही मध्ये टाका. मध किंवा साखर घाला. यात चिकनचे भाजलेले तुकडे टाकून 2-3 मिनिटे शिजवा. अगदी शेवटी फ्रेश क्रीम घालून मिक्स करा. (क्रीम घालून फार शिजवू नका. ग्रेव्हीच्या आंबटपणामुळे क्रीम फाटू शकते.)
  • बाऊलमध्ये घेऊन त्यावर थोडे क्रीम आणि कोथिंबीर टाका. पोळी, नान, पराठा किंवा भात याबरोबर बटर चिकनवर मस्त ताव मारा. 

खरतर या अशा इतक्या सोप्या पदार्थाला त्याची अशी विशिष्ट चव येते ती कसुरी मेथी मुळे. शिवाय यात आधीच ओव्हनमध्ये भाजलेले चिकन टाकल्यामुळे त्या चिकनलाही मस्त खरपूस चव लागते. ग्रेव्ही मधला tomato चा आंबटपणा, मध / साखरेची गोडसर चव आणि क्रीममुळे आलेले silky texture यांनी तर रंगत अजूनच वाढते. चला तर मग लगेचच बनवायच्या तयारीला लागा.  

Tuesday, June 21, 2011

सुरळीच्या वड्या

     कधी लग्नाला गेलेले असताना जेवणाच्या ताटातले बाकीचे सगळे मुख्य पदार्थ सोडून एका पिवळ्या रंगाच्या, अत्यंत रुचकर, मऊसुत अशा साईड डिश कडे आपले सगळे लक्ष एकवटले आहे असे तुमच्या बाबतीत कधी झालाय का? किंवा घरी येताना अचानक एखाद्या दुकानातला ओलं खोबरं, कोथिंबीर आणि फोडणीनी सजलेला ट्रे नजरेला पडल्यावर त्यातल्या पदार्थाकडे तुम्ही खेचले गेलात आणि तो घरी घेऊनच आलात असं कधी झालाय का? कधी घरी सणाच्या दिवशी किंवा कोणी येणार म्हणून आईनी विशेष बनवलेल्या जेवणातले पदार्थ टेबलावर मांडून ठेवलेले असतात आणि त्यातला एक चवदार, खमंग पदार्थ येता जाता सारखा तोंडात टाकावा अशी तीव्र इच्छा होत असते असं कधी झालाय का? माझ्या बाबतीत तर हे अनेकदा झालाय, सुरळीच्या वड्या बघून.....
     हा पदार्थ म्हणजे एक आश्चर्य आहे. एकच पदार्थ सौम्य पण खमंग,  म्हणलं तर तिखट, म्हणलं तर आंबट आणि गोडसर, मधेच मऊसुत आणि मधेच कोथिंबीर, खोबऱ्यामुळे जरा जाडसर असा कसा काय लागू शकतो! इतका नाजूक की दातांऐवजी ओठांनीही खाऊ शकाल.
     सुरळीच्या वड्यांच्या बाबतीत एक आठवण मला नेहमी आठवते. हा पदार्थ मला स्वतःला इतका आवडतो की मी त्या ममाकडून शिकले होते आणि बऱ्याचदा केल्याही होत्या. माझं लग्न ठरल्यानंतर मी एकदा होणाऱ्या सासरी गेले होते तिकडेही सुरळीच्या वड्या सगळ्यांना खूप आवडतात म्हणून मी त्या बनवल्या, तेजसच्या आजी, आजोबांकडेही घेऊन गेले. सगळ्यांना त्या अतिशय आवडल्या. माझं खूप कौतुक झालं आणि सुरळीच्या वड्या जमल्या म्हणजे हिला सगळाच स्वयंपाक छान जमतो अशी सगळ्यांनी पावती दिली. आता गम्मत अशी होती की तोपर्यंत मी अनेक पदार्थ बनवत असले तरी रोजचा स्वयंपाक बनवण्याची सवय नव्हती. त्यामुळे सगळ्यांचा माझ्याबद्दल झालेला समज अर्धा खरा होता. ही हकीकत बाकी सगळ्यांना कळली तेव्हा मात्र सगळ्यांनी, "मालविकानी सुरळीच्या वड्या करून सासरच्यांना गुंडाळलं." असं चिडवून मला हैराण केलं.
     तर अशा या सुरळीच्या वड्या आता तुम्हालाही खाव्याशा वाटायला लागल्या आहेत ना? चला मग लगेच बनवूया. 

साहित्य:
1 वाटी डाळीचे पीठ, 1 वाटी ताक किंवा दही, 2 वाट्या पाणी, पाऊण इंच आलं, 1 मिरची, हळद, 1 ते 1.5 चमचा साखर, चवीनुसार मीठ, आवडत असल्यास 1-2 पाकळ्या लसूण, पाऊण वाटी खवलेलं ओलं खोबरं, पाऊण वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.
फोडणीसाठी: तेल, मोहोरी, तीळ, हिंग.




कृती:
  • डाळीचे पीठ चाळून घ्या.
  • मिक्सर मध्ये आलं आणि मिरची बारीक वाटून घ्या. त्यातच डाळीचे पीठ, दही / ताक, पाणी, मीठ, साखर, हळद टाका आणि मिक्सर मधेच नीट मिसळून घ्या. (मिक्सर मध्ये सर्व घटक मिसळल्यामुळे  अजिबात गुठळ्या होत नाहीत.)
  • एका कढईत मिश्रण ओतून gas वर ठेवा आणि सतत ढवळत रहा.
  • मिश्रणात चमचा घालून तो उचलून बघा मिश्रण जीभेसारखे (फोटोत दाखवल्याप्रमाणे) दिसले की कढईवर झाकण ठेवा. 4-5 मिनिटांनी चांगली वाफ आली की gas बंद करा. 
  • मिश्रण अगदी गरम असताना पटकन प्लास्टिकच्या sheet वर शक्य तितके पातळ पसरा. त्यावर खवलेलं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पसरा. (काही वेळा खोबरं, कोथिंबीर अशी आत न घालता वड्या गुंडाळून झाल्यावर फक्त वरून घातली जाते पण अशा वड्या थोड्या सपक लागू शकतात. वड्या खोबरं, कोथिंबीर पसरून गुडाळल्या की त्याची चव छान आतपासून लागते.)
  • पसरलेल्या मिश्रणावर सुरीनी उभ्या रेघेत कापा आणि हलक्या हाताने वडी गुंडाळा. 
  • तेल तापवून त्यात मोहोरी, हिंग, तीळ टाका. ही फोडणी सुरळीच्या वड्यांवर वरून टाका. सजावटीसाठी थोडं खोबरं, कोथिंबीर टाका.

अशा या मऊ, लुसलुशीत, खमंग सुरळीच्या वड्या तयार झाल्या. एखाद्या खास मेन्यू बरोबर साईड डिश म्हणून किंवा नेहमीचाच मेन्यू खास बनावा म्हणून तुम्ही या करू शकता. केल्यावर जेवेपर्यंत झाकून ठेवा म्हणजे त्या कोरड्या पडणार नाहीत आणि मुख्य म्हणजे जेवायच्या आधीच येता जाता खाऊन संपणार नाहीत. नक्की करा आणि सांगा तुम्ही घरच्यांना गुंडाळलत की नाहीत !!!









Monday, June 13, 2011

मिसळ

     मला वाटतं महाराष्ट्रातली कुठलीही 2 माणसे एकत्र येऊन गप्पा मारायला लागली आणि गाडी खाण्याकडे वळली तर मिसळीचा विषय निघाला नाही असे होणारच नाही. मिसळ हा प्रत्येकाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो आणि त्या बाबतीत चर्चेलाही खूप वाव असतो. प्रत्येकाची स्वतःची अशी एक आवडती मिसळ असते. आणि तीच कशी मस्त लागते हे प्रत्येकजण दुसऱ्याला पटवत असतो.
     मिसळीच्या चवी गावानुसार, जागेनुसार, हॉटेलनुसार आणि ती बनवणाऱ्या माणसानुसार, त्याच्या त्यावेळच्या मूडनुसार बदलतात. कधी खूप तिखट जाळ, कधी जरा गोडसर, कधी मध्यम तिखट आणि चवदार अशा कितीतरी चवी. मुळात मिसळ या नावातच आहे त्याप्रमाणे हा पदार्थ म्हणजे अनेक गोष्टींची एकत्रित चव असल्यामुळे ते घटक बदलले की चव बदलते. कुठे मिसळीत पोहे घालतात तर कुठे बटाट्याची भाजी, कुठे भाजक्या पोह्यांचा चिवडा तर कुठे पातळ पोह्यांचा किंवा चुरामुऱ्यांचा, कुठे फरसाण तर कुठे नुसत्याच गाठी आणि पापडी, कुठे रश्शात नुसता कांदा, लसूण तर कुठे मटकी किंवा इतर कडधान्ये अशी असंख्य combinations बघायला आणि खायला मिळतात.
     नुसता विषय जरी काढला तरी आपण आत्तापर्यंत खाल्लेल्या वेगवेगळ्या मिसळी एकदम आठवतात. एखाद्या सुट्टीच्या दिवशी आपण लवकर उठतो आणि मित्रांना गोळा करून मस्त टेकडीवरून किंवा घाटात फिरून येतो. आणि घरी येताना अचानक मिसळीचे हॉटेल दिसते. दिसते म्हणण्यापेक्षा ते तिथे आहे हे नाकाला कळते. आणि मग काय आधीच सपाटून भूक लागलेली असताना पाय सहजच मिसळीच्या दुकानाकडे वळणे अगदी स्वाभाविक असते.
     माझ्याही मिसळी संबंधीच्या खूप आठवणी आहेत. शिक्षणाच्या निमित्ताने मी जेव्हा दिल्लीला होते तेव्हा सुट्टीसाठी पुणे, वाईला आल्यावर काय खायचं याची एक लिस्ट तयार असायची. त्यात मिसळ नेहमी असायचीच. कधी पुण्यातल्या एखाद्या हॉटेलमधली किंवा कधी घरी बनवलेली. वाईला आमच्या ओळखीचे एक जोशी काका आहेत. ते खूप मस्त मिसळ बनवतात आणि ती बनवण्याची त्यांची एक विशिष्ट पद्धत आहे. दर वर्षी दिवाळीत मध्ये जो एक भाकड दिवस येतो त्या दिवशी ते सगळ्यांना मिसळ खायला घरी बोलावतात. दिवाळीसाठी मी आणि दादा घरी गेलो की कधी एकदा त्यांचा फोन येतो म्हणून टुकत बसतो. 
     तर अशी ही आपल्या सगळ्यांचीच आवडती मिसळ. चला तर मग बनवूया.

साहित्य: 3 लोकांसाठी 
रश्शासाठी: 2 वाट्या मोडाची मटकी, पाव वाटी मोडाचे वाटणे, पाव वाटी बारीक चिरलेला tomato,  पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धा इंच आलं, 3 पाकळ्या लसूण, अर्धा टी स्पून चिरलेला गुळ, 1 मिरची, पाव टी स्पून कांदा लसूण मसाला, मीठ, धनेपावडर, जिरे पावडर, फोडणीसाठी तेल, मोहोरी, हळद, हिंग, कढीलिंब 
मिसळीसाठी: 1 वाटी बारीक चिरलेला tomato, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 उकडलेला बटाटा, 1 वाटी फरसाण, 1 वाटी भाजक्या पोह्यांचा चिवडा किंवा भडंग, बारीक शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबू, आवडत असल्यास दही आणि ब्रेड.





कृती:

  • एका पातेल्यात पाणी तापवत ठेवा. 
  • एका काढईत तेल गरम करा. त्यात मोहोरी टाका. ती तडतडली की हिंग, हळद, कढीलिंब आणि मिरचीचे तुकडे टाका.
  • त्यात आलं, लसूण पेस्ट टाका आणि परतून घ्या. मग कांदा टाकून परता. कांदा थोडा brown झाला की tomato परता.
  • त्यात मोडाची मटकी, वाटणे टाकून 5-7 मिनिटे परतत रहा. जरूर असल्यास थोडे तेल घाला. कडधान्ये चांगली परतून घेतल्यामुळे त्याचा  उग्रपणा कमी होतो. नंतर रस्सा पातळ होईल एवढे उकळते पाणी टाका आणि 5 मिनिटे शिजू द्या. (@Rajendra तुझ्या टीप बद्दल thanks.)
  • मग त्यात गूळ, धने पावडर, जिरे पावडर, कांदा लसूण मसाला, मीठ टाका आणि परत मंद gas वर 7-10 मिनिटे उकळा.  
  • एका बाउल मध्ये फरसाण आणि चिवडा घ्या. त्यावर बारीक चिरलेला कांदा, tomato, उकडलेल्या बटाट्याचे तुकडे (@ Sulabha तुझ्या टीप बद्दल thanks. उकडलेला बटाटा रश्शात टाकला तर तो अधिक चवदार लागतो.), बारीक शेव आणि कोथिंबीर टाका. त्यावर उकळता रस्सा टाका. (रस्सा टाकण्यापूर्वी नीट हलवून घ्या कारण मटकी, वाटाणा रश्शात खाली बसतो.) वरून लिंबू पिळा.
  • दह्याबरोबर खा. आवडत असल्यास बरोबर ब्रेड खाऊ शकता.

रश्शाचा वास तर केव्हापासूनच येत असेल ना? आता असा बाउल भरल्यावर अनेक रंगांमुळे तर विशेष छान दिसेल. प्रत्येक घासला वेगवेगळ्या चवी लागत असल्यामुळे जीभ अगदी तृप्त होईल. आता हे अजून वाचत बसू नका. मिसळीचा मस्त आस्वाद घ्या.












  

Thursday, June 9, 2011

Trifle Pudding

     श्श !! काय भयंकर उकडतंय. बाहेर केवढं ऊन आहे आणि घरात पंखा चालू असून सुद्धा नुसतं गरम होतय. अशा उन्हाळ्यातल्या एखाद्या दुपारी आपण घरात बसून विचार करत असतो. अचानक आपल्याला लहानपणीची उन्हाळ्याची सुट्टी आठवते. तेव्हाही असच उकडत असून आपण मात्र अगदी मजेत असायचो. एकतर शाळा नाही त्यामुळे एकदम स्वातंत्र्य. त्यातून आपली कोणी चुलत मामे भावंडे सुट्टीसाठी आलेली, शेजारचे मित्र मैत्रिणी जमलेले आणि पत्त्यांचा डाव रंगलेला. सगळे अगदी चढाओढीनी खेळत असताना आई सगळ्यांसाठी सरबताचे ग्लास घेऊन यायची. सगळेजण हातातले पत्ते खाली टाकून सरबताच्या ट्रेकडे झेपावायचे. ते थंडगार सरबत घशाखाली उतरल्यावर काय स्वर्गसुख वाटायचं.
     कधी कधी घरी पॉटचे आईस्क्रीम करण्याचा बेत असायचा. त्या पॉट मध्ये आईस्क्रीमचे मिश्रण आणि कडेनी बर्फ, मीठ टाकून सगळे कुटुंब त्याभोवती जमायचं. मग आळीपाळीने पॉटचे handle फिरवून सगळेजण आईस्क्रीम घट्ट होण्याची वाट बघायचे. आणि एकदा का ते घट्ट झालं की कधी एकदा खातो असं सगळ्यांना व्हायचं. त्या तशा उन्हाळ्यातल्या संध्याकाळी गार गार, चवदार आईस्क्रीमचा पहिला चमचा तोंडात घातल्यावर जिभेवर आणि मनातही एकदम गारवा यायचा. मन अगदी तृप्त होईपर्यंत पोटभर आईस्क्रीम खाल्लं जायचं.
     उन्हाळ्यातल्या गरम दुपारी या आणि अशासारख्या कितीतरी गोड आणि थंडगार आठवणी आपल्या मनात यायला लागतात. आत्ताही असच काहीतरी गार गार आणि चविष्ट, जिभेला आणि मनाला थंडावा देणारं खावास वाटायला लागत. How about Trifle Pudding? चला लगेच बनवायला घेऊया.  

साहित्य: 
घरी बनवलेला किंवा आणलेला प्लेन केक. (Vanilla फ्लेवर असेल तर चांगला लागतो.), strawberry किंवा raspberry फ्लेवरची जेली, Vanilla आईस्क्रीम, सोलून तुकडे केलेली आंबट गोड फळं (संत्र, मोसंब, द्राक्ष, अननस, strawberry यापैकी कुठलीही.), छोटा chocolate चा तुकडा, आवडत असल्यास ड्राय फ्रुट्स.

कृती:
  • बाजारात jelly crystals नावानी जेली बनवण्यासाठीचा पुडा मिळतो. त्यावरच्या सूचनांनुसार जेली बनवून फ्रीज मध्ये थंड करत ठेवा. 
  • नुसता अननस दुधाच्या कुठल्याही पदार्थाबरोबर वापरला तर तो कडू लागू शकतो. म्हणून अननस वापरणार असलात तर तो कापून तुकडे करून साखरेत घालून ठेवा. 
  • केक घरी केला असेल तर तो पूर्ण गार होउद्या. गरम केकमुळे आईस्क्रीम वितळेल. 
  • एखादा उभट काचेचा बाउल किंवा ग्लास घ्या. त्यात सर्वात खाली केकचा छोटा तुकडा घाला. त्यावर आईस्क्रीम घाला. त्यावर फळांचे तुकडे घाला आणि त्यावर जेली घाला. बाउल मध्ये जागा असल्यास  ह्या क्रमाने परत एकदा सगळे थर घाला.
  • सर्वात वर chocolate किसून घाला आणि आवडत असल्यास ड्राय फ्रुट्स घाला.
अशा प्रकारे आपले Trifle Pudding तयार झाले. काचेच्या बाउल मुळे सगळे थर आणि त्याचे वेगवेगळे रंग मस्त दिसतात. शिवाय फळांच्या रंगांमुळे तर बाउल विशेष छान दिसतो. उभा चमचा घालून सगळे थर चमच्यात घ्या आणि जिभेला थंड आणि मनाला तृप्त करा.